नवी दिल्ली : स्मार्टफोन उत्पादनात भारत हा मोठा उत्पादक म्हणून उदयास आला आहे. भारत हा अमेरिकेला सर्वात जास्त स्मार्टफोन निर्यात करणारा देश ठरला आहे. भारताने याबाबतीत चीनला मागे टाकले आहे, असा अहवाल कॅनॅलिजने दिला आहे. टॅरिफ चर्चेनंतर चीनला भारताने मागे टाकले.
कॅनॅलिजने सांगितले की, यंदाच्या कॅलेंडर वर्षातील दुसऱ्या तिमाहीत अमेरिकेत स्मार्टफोन शिपमेंटमध्ये १ टक्का वाढ झाली. चीन व अमेरिकेच्या टॅरिफबाबत अनिश्चितता झाल्याने चीनने पुरवठा साखळीत बदल केले आहेत. त्यामुळे अमेरिकेत चीनमधून होणारा स्मार्टफोनचा पुरवठा २५ टक्के घटला आहे, तर भारतात बनलेल्या स्मार्टफोनचे उत्पादन २४० टक्क्याने वाढले आहे. तर अमेरिकेत निर्यात करण्यात येणाऱ्या स्मार्टफोनचे प्रमाण ४४ टक्क्याने वाढले. तर दुसऱ्यांदा तिमाहीत आयफोन निर्यातीत ११ टक्के घसरण झाली. हे प्रमाण १३.३ दशलक्ष युनिट झाले. तर २०२५ च्या पहिल्या तिमाहीत २५ टक्के वाढ झाली. सॅमसंगची निर्यात ३८ टक्के वाढून ती ८.३ दशलक्ष युनिट झाली.
गुगल व टीसीएल हे पहिल्या पाचात आले. मोटोरोलाने आपला अमेरिकेतील विस्तार कायम ठेवला. मोटोरोलाने दोन टक्के वाढ करून ३.२ दशलक्ष युनिटची विक्री केली. गुगलची विक्री १३ टक्क्याने वाढून ०.८ दशलक्ष युनिट्स तर टीसीएलची विक्री २३ टक्के घटून ०.७ दशलक्ष युनिट राहिली.
ॲॅपल चीनमधील रिटेल स्टोअर बंद करणार
ॲॅपलने चीनमधील रिटेल स्टोअर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या डालियन शहरातील झोंगशान जिल्ह्यातील त्यांचा पार्कलँड मॉल ९ ऑगस्टपासून बंद होईल. सध्या ॲॅपल चीनमध्ये आव्हानात्मक परिस्थितीत काम करत आहे.