
न्यूयॉर्क : भारत व अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या तणावाचे कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल पारितोषिकाची इच्छा असल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानने मला नोबेल पारितोषिकासाठी नामांकित केले, तुम्हीही करा, असा हट्ट ट्रम्प यांनी धरला. ती मागणी पंतप्रधान मोदी यांनी फेटाळल्याने ट्रम्प नाराज झाले. यानंतर त्यांनी भारताला 'टॅरिफ' कोंडीत पकडायला सुरुवातच केल्याचे दिसून आले.
'न्यूयॉर्क टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी १७ जूनला पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली होती. त्याचवेळी ट्रम्प यांनी सांगितले की, भारत-पाक दरम्यान युद्धविराम केल्याप्रकरणी मला अभिमान वाटतो. त्यानंतर पाकिस्तानला मला नोबेलसाठी नामांकित करत आहे. तेव्हा भारतानेही ते करावे, असे ट्रम्प यांनी मोदींना सुचवले. तेव्हा पंतप्रधान मोदी हे नाराजी झाले.
ते मोदीना म्हणाले की, भारत-पाक दरम्यान झालेल्या युद्धविरामाबाबत अमेरिकेचे काहीही देणेघेणे नाही. हा युद्धविराम भारत-पाकमध्ये थेट झाला आहे.
मोदी यांच्या बोलण्याकडे ट्रम्प यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये तणाव वाढला. त्यानंतर दोघांनीही एकमेकांशी चर्चा केली नाही.
हे वृत्त अमेरिका व नवी दिल्लीतील अनेक लोकांशी संवाद साधल्यानंतर तयार केले आहे. त्यातील बहुतेकांनी आपले नाव न सांगण्याच्या अटीवर ही बाब जाहीर केली. ट्रम्प व भारताच्या संबंधात मोठा परिणाम होणार आहे. ट्रम्प यांच्या धोरणामुळे भारत-अमेरिकेचे संबंध कमकुवत होत आहेत, असे या लोकांनी सांगितले.
भारत आपली अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार अमेरिका नाराज झाला.
'क्वाड' साठी ट्रम्प भारतात येणार नाहीत
'न्यूयॉर्क टाईम्स'ने सांगितले की, मोदी यांनी ट्रम्प यांना खरा मित्र म्हटले होते. आता त्यांचे संबंध चांगले नाहीत. त्यामुळे भारतात होणाऱ्या 'क्वाड' परिषदेला ट्रम्प हे भारतात येणार नाहीत. यापूर्वी त्यांनी या परिषदेत सहभागी होण्याचे ठरवले होते. भारतात आता ट्रम्प यांच्याविरोधात नकारात्मक वातावरण बनले आहे.