नवी दिल्ली : दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, कोणत्याही परिस्थितीत ते आता वाचणार नाहीत. ऑपरेशन सिंदूरचे उदाहरण देत भारताच्या लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानला शनिवारी थेट इशारा दिला आहे. कारगिल विजय दिनानिमित्त बोलताना सरसेनानी उपेंद्र द्विवेदी यांनी भविष्यातील भारताची तयारी आणि योजनाबाबत माहिती दिली. त्याशिवाय पाकिस्तानवर टीकेची तोफ डागली. रुद्र, भैरव यासारख्या युनिट्सची स्थापना आणि ऑपरेशन सिंदूरच्या यशावर भर देत पाकिस्तानला सुधारण्याचा इशारा दिला आहे. त्यासोबतच लडाखमधील पायाभूत सुविधा आणि सीमा पर्यटनावरही त्यांनी लष्कराची भूमिका स्पष्ट केली.
कारगिल विजय दिवसानिमित्त उपेंद्र द्विवेदी यांनी भारतीय सैन्याच्या तयारीबदल माहिती दिली. त्याशिवाय पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तराबाबत रोखठोक मत मांडले. पाकिस्तानकडून झालेल्या कारवायांना भारतीय सैन्याने अचूक आणि संयमित प्रत्युत्तर दिले. आर्मी एअर डिफेन्स एक अभेद्य भिंत म्हणून उभी राहिली, कोणतेही ड्रोन किंवा मिसाईल तिला भेटू शकले नाही, असे त्यांनी सांगितले.
ऑपरेशन सिंदूरवेळी मिळालेले हे यश 'व्होल-ऑफ-नेशन अप्रोच'चा परिणाम आहे. त्यामध्ये सैन्य, वायुसेना, नौदल आणि इतर सरकारी विभागांनी एकत्र काम केले, असे द्विवेदी यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, भारताच्या सार्वभौमत्वाला, अखंडतेला किंवा नागरिकांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही शक्तीला आता चोख प्रत्युत्तर मिळेल. भारतीय सैन्य आता एक परिवर्तनशील, आधुनिक शक्ती म्हणून वेगाने पुढे जात आहे.
रुद्र ब्रिगेडची रचना
लष्कराला भविष्याभिमुख आणि अधिक प्रभावी बनवण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून 'रुद्र' ब्रिगेडची निर्मिती केली जात आहे. द्विवेदी यांनी सांगितले की, आजचे भारतीय लष्कर केवळ सध्याच्या आव्हानांना तोंड देत नाही, तर वेगाने स्वतःला आधुनिक आणि भविष्यासाठी सज्ज दलामध्ये रूपांतरित करत आहे. रुद्र ब्रिगेडची रचना पारंपरिक ब्रिगेडपेक्षा वेगळी असेल. आतापर्यंत लष्करात विशिष्ट दलांच्या (उदा. फक्त पायदळ किंवा फक्त तोफखाना) ब्रिगेड होत्या. मात्र 'रुद्र' ब्रिगेडमध्ये विविध लढाऊ दलांचा एकत्रित समावेश असेल. यामध्ये पायदळ, मेकॅनाइज्ड इन्फंट्री, चिलखती दल, तोफखाना, विशेष दल, मानवरहित हवाई प्रणाली (ड्रोन) यांचा समावेश असेल. या सर्व दलांना आवश्यक लॉजिस्टिक्स आणि लढाऊ सहाय्य पुरवले जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन इन्फंट्री ब्रिगेडचे रूपांतर 'रुद्र' ब्रिगेडमध्ये करण्यात आले आहे. या रचनेमुळे युद्धभूमीवर अधिक वेगाने आणि समन्वयाने कारवाई करणे शक्य होणार आहे.
लष्कराच्या आधुनिकीकरणाचे इतर टप्पे
जनरल द्विवेदी यांनी लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या इतर योजनांचीही माहिती दिली. 'भैरव' लाइट कमांडो बटालियन सीमेवर शत्रूला धक्का देण्यासाठी 'भैरव' नावाच्या चपळ आणि घातक विशेष दलांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक पायदळ बटालियनमध्ये आता ड्रोन प्लाटूनचा समावेश करण्यात आला आहे. तोफखान्याची मारक क्षमता वाढवण्यासाठी 'दिव्यास्त्र बॅटरी' आणि 'लॉइटर म्युनिशन बॅटरी' तैनात केल्या आहेत. लष्कराच्या हवाई संरक्षण दलाला स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र प्रणालींनी सुसज्ज केले जात आहे. या सर्व बदलांमुळे आपली ताकद अनेक पटींनी वाढेल, असा विश्वास द्विवेदी यांनी व्यक्त केला.
लष्कराची सज्जता
कारगिल विजयदिनाचे औचित्य साधून उपेंद्र द्विवेदी यांनी लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. भारतीय लष्कराला भविष्यासाठी सज्ज आणि अधिक घातक बनवण्यासाठी 'रुद्र' नावाच्या नव्या 'ऑल-आर्म्स ब्रिगेड'ची (सर्व-शस्त्र ब्रिगेड) स्थापना करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकावर आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. 'भैरव' लाइट कमांडो बटालियन सीमेवर शत्रूला धक्का देण्यासाठी 'भैरव' नावाच्या चपळ आणि घातक विशेष दलांची स्थापना करण्यात आली आहे.