ISS मध्ये ‘शुभ’ प्रवेश! अंतराळ स्थानकात पोहोचणारे पहिले भारतीय; २८ तासांचा खडतर प्रवास

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील त्यांच्या पहिल्याच भाषणात कमांडर पेगी व्हिट्सन यांनी शुभांशू शुक्ला यांना अंतराळवीर क्रमांक ६३४ म्हणून नियुक्त केले. "अंतराळातून माझा सर्वांना नमस्कार, या प्रवासाचे वर्णन करता येणार नाही. आम्हाला हळूहळू शून्य गुरुत्वाकर्षणाची (झीरो ग्रॅव्हिटी) सवय होत आहे. मी या स्थितीची सवय करून घेतोय. एखादे बाळ चालायला शिकते तसेच मीही शिकतोय. इथे कसे वावरायचे, स्वतःला कसे...
शुभांशू शुक्ला Axiom-4 मधील अन्य अंतराळवीरांसह आयएसएसमध्ये प्रवेश करतानाच्या ऐतिहासिक क्षणाचे पहिले दृश्य.
शुभांशू शुक्ला Axiom-4 मधील अन्य अंतराळवीरांसह आयएसएसमध्ये प्रवेश करतानाच्या ऐतिहासिक क्षणाचे पहिले दृश्य.X/@NASA
Published on

नवी दिल्ली : गेली पाच दशके अंतराळ क्षेत्रात भारताने चमकदार कामगिरी केली आहे. चंद्रावर, मंगळावर यान पाठवून तसेच विविध उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करून भारताने अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात आपले नाव कमावले. प्रत्यक्ष अंतराळात माणूस पाठवण्यासाठी भारताला राकेश शर्मा यांच्या रूपाने १९८४ हे वर्ष उजाडले. त्यानंतर ४१ वर्षांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात भारतीयाचे पाऊल शुभांशू शर्मा यांच्या रूपाने उमटले आहे. २८ तासांच्या खडतर प्रवासानंतर शर्मा यांचे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट गुरुवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) पोहचले. शुभांशू तेथे दाखल झाल्यानंतर भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील त्यांच्या पहिल्याच भाषणात कमांडर पेगी व्हिट्सन यांनी शुभांशू शुक्ला यांना अंतराळवीर क्रमांक ६३४ म्हणून नियुक्त केले. शुक्ला यांच्यासोबत अंतराळवीर स्लावोझ उझन्स्की-विस्नविस्की, टिबोर कापू हे ‘आयएसएस’वर गेले आहेत. शुक्ला हे अंतराळ प्रयोगशाळेत पुढील १४ दिवसांसाठी नियोजित प्रयोग आणि इतर वैज्ञानिक प्रयोग करणार आहेत. हे यान भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी ४.१५ वाजता अंतराळ केंद्रावर ‘डॉक’ झाले. त्यानंतर ‘अ‍ॅक्सिओम-४’ मिशनमधील अंतराळवीर हे ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून एका हॅचद्वारे ‘आयएसएस’मध्ये तरंगले.

भारताच्या हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर बुधवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले. नासा, स्पेसएक्स व ॲक्सिओम स्पेसच्या संयुक्त अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेंतर्गत हे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाऊन प्रयोग करणार आहेत. भारताच्या राकेश शर्मा यांच्यानंतर तब्बल ४१ वर्षांनी शुभांशू शुक्ला यांनी अवकाशात झेप घेतली आहे.

शुभांशू शुक्ला म्हणाले, अंतराळात आतापर्यंत आम्ही जे जे काही पाहिले ते खूप रोमांचित करणारे होते, मी ते कधीच विसरू शकणार नाही. या प्रवासात खूप जणांचे योगदान आहे.

मोहिमेपूर्वीच्या संदेशात शुक्ला म्हणाले की, या प्रवासात सर्व भारतीय माझ्याबरोबर आहेत. ही केवळ माझ्या एकट्याच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील प्रवासाची सुरुवात नसून, भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात आहे. या मोहिमेमुळे भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाला (ह्युमन स्पेस प्रोग्राम) एक नवीन दिशा मिळणार आहे. देशातील सर्व नागरिकांनी या प्रवासाचा भाग व्हावे, अशीही माझी इच्छा आहे.

या अंतराळ केंद्रावर निकोल आयर्स, ॲॅने मॅकेन, जॉनी किम (नासा), ताकुयू ओनिशी (जाक्सा, जपान), किरील पेस्कोव्ह, सर्जेई रॅझिकोव्ह व ॲॅलेक्सी झुब्रीटक्सी (रॉसकोमॉस, रशिया) हे यापूर्वीच संशोधन करत आहेत.

शून्य गुरुत्वाकर्षणाची सवय करून घेतोय - शुक्ला

अंतराळातून माझा सर्वांना नमस्कार, या प्रवासाचे वर्णन करता येणार नाही. आम्हाला हळूहळू शून्य गुरुत्वाकर्षणाची (झीरो ग्रॅव्हिटी) सवय होत आहे. मी या स्थितीची सवय करून घेतोय. एखादे बाळ चालायला शिकते तसेच मीही शिकतोय. इथे कसे वावरायचे, स्वतःला कसे सांभाळायचे हे शिकतोय. मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतोय. हे सगळे खूप गमतीदार आहे, हा प्रवास खूप रोमांचक आहे, असा व्हिडीओ संदेश ‘ॲक्सिओम-४’ मोहिमेंतर्गत अंतराळात गेलेले अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी पाठविला आहे.

logo
marathi.freepressjournal.in