

कॅनडातील मिसिसॉगा शहरातून भारतीय वंशाच्या तरुणाचा धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकार समोर आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तो स्वतःला गंभीर वैद्यकीय समस्या असल्याचे सांगून महिला डॉक्टरांसमोर शरीर तपासणीच्या नावाखाली अयोग्य स्पर्श करवून घेण्याचा प्रयत्न करत असे.
पील रीजनल पोलिसांनी (PRP) याबाबत माहिती दिली आहे. वैभव असे २५ वर्षीय आरोपीचे नाव असून तो वारंवार वेगवेगळ्या क्लिनिकमध्ये जात असे. तिथे स्वतःला गंभीर वैद्यकीय समस्या असल्याचे सांगून महिला डॉक्टरांकडून नको त्या ठिकाणी स्पर्श करवून घेण्याचा प्रयत्नात असायचा. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. अनेकदा तो स्वतःची ओळख लपवून आकाशदीप सिंग असे स्वतःचे नाव सांगायचा.
अजून काही घटनांचा संशय, पीडित महिलांना संपर्क साधण्याचे आवाहन
१२ डिव्हिजन क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (CIB) ४ डिसेंबर रोजी त्याला अटक केली. “अश्लील कृत्याच्या प्रकरणी ब्रॅम्पटन येथील एका तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.” असे पोलिसांनी आपल्या निवेदनात सांगितले आहे. या प्रकरणात आणखीही काही महिला बळी असू शकतात, ज्या अद्याप समोर आलेल्या नाहीत. या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहनही पोलिसांनी आपल्या निवेदनात केले आहे.
आरोपीवर सार्वजनिक ठिकाणी अश्लील किंवा अशोभनीय कृत्य (Indecent Act in a Public Place), फायदा मिळवण्याच्या उद्देशाने ओळखपत्रामध्ये फसवणूक (Identity Fraud with Intent to Gain Advantage), इतर व्यक्तीचे ओळखपत्र बाळगणे (Possession of an Identity Document) आणि इतरांची ओळख चोरी करणे (Identity Theft) असे आरोप आहेत.