

काठमांडू : नेपाळमधील प्रसिद्ध मनकामना देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भारतीय भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. गोरखा जिल्ह्यातील शहीद लखन ग्रामपंचायतीच्या कांतार क्षेत्रात ही बस खोल दरीत कोसळल्याने किमान सात भारतीय भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
शनिवारी संध्याकाळी मनकामना मंदिरातून दर्शन घेऊन ही इलेक्ट्रिक मायक्रोबस अनबुखैरेनीच्या दिशेने जात असताना ‘कांत्तर’ भागात एका तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत कोसळली. अपघातात जखमी झालेल्या सात भाविकांना तातडीने उपचारासाठी चितवन येथील चितवन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या अपघातात बसचा स्थानिक चालक आणि त्याचा सहाय्यकही जखमी झाले आहेत, ज्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये मुथु कुमार (५८), अनामालिक (५८), मीनाक्षी (५९), शिवगामी (५३), विजयल (५७), मीना (५८) आणि तमिलरसी (६०) यांचा समावेश आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. स्थानिक लोक आणि पोलिसांनी तत्काळ बचाव आणि मदतीचे काम सुरू केले.
गोरखाचे मुख्य जिल्हा अधिकारी तुलसी बहादुर श्रेष्ठ यांनी सांगितले की, “मंदिरामधून निघाल्यानंतर सर्व प्रवासी कुठे जात होते, हे स्पष्ट झालेले नाही.” नेपाळमध्ये पर्वतीय रस्त्यांची रचना आणि खराब रस्ता सुरक्षा व्यवस्थेमुळे सातत्याने अपघात घडत आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, नेपाळमध्ये रस्ते दुर्घटना झपाट्याने वाढत आहे. १० वर्षांपूर्वी रस्ता दुर्घटनांची संख्या ४,९९९ नोंदवली गेली. २०२४-२५ सालच्या अधिकृत आकडेवारीनुसार, ७ हजार ६६९ रस्ते दुर्घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये १९० लोक मृत्युमुखी पडले आहेत. नेपाळमध्ये रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांपैकी ७० टक्क्यांहून अधिक हे पादचारी, सायकलस्वार आणि मोटारसायकलस्वार असतात.