मेलबर्न : ऑस्ट्रेलियाने दोन भारतीय हेरांवर कारवाई केल्याची चर्चा आहे. २०२० मध्ये या भारतीय हेरांनी ऑस्ट्रेलियाचे संरक्षण प्रकल्प व विमानतळाशी संबंधित सुरक्षा व्यवस्थेची गुप्त माहिती मिळवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे, अशी माहिती ‘द ऑस्ट्रेलियन’ व ‘द सिडनी मॉर्निंग हेराल्ड’ने दिली आहे.
या हेरगिरीमागे ‘रॉ’च्या अधिकाऱ्यांचा हात होता, अशी चर्चा आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर भारतीय हेरांना देशातून बाहेर काढण्यात आले.
ऑस्ट्रेलियाचे ज्येष्ठ मंत्री जिम चार्लमर्स यांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणात पडू इच्छित नाही. भारतासोबत आमची चांगली मैत्री आहे. दोन्ही देशांचे संबंध चांगले आहेत. तर ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर भारताने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
‘एबीसी न्यूज’ने ऑस्ट्रेलियाची सुरक्षा संस्था व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही बातमी दिली. २०२० मध्ये हेरांच्या पथकाने ऑस्ट्रेलियाच्या विमानतळ व सुरक्षा आस्थापनांशी संबंधित माहिती चोरण्याचा प्रयत्न केला होता.
ऑस्ट्रेलियन सुरक्षा गुप्तचर संघटनेचे संचालक माईक बर्गेस यांनीही याबाबतचे संकेत दिले होते. मात्र, हे हेर कोणत्या देशाचे होते याची माहिती दिली नाही. या हेरांनी राजकारणी, माजी मंत्री, परदेशी दूतावास व पोलिसांशी चांगले संबंध बनवण्याचे प्रयत्न केले. त्यांनी ऑस्ट्रेलियातील मोठ्या विमानतळाची माहिती देण्यासाठी एका सरकारी अधिकाऱ्याला तयार केल्याचे उघड झाले आहे.