श्रीलंकेत भारतीयांना मिळणार मोफत पर्यटन व्हिसा

श्रीलंकेने भारतासहित अन्य सहा देशांना मोफत पर्यटन व्हिसा देण्याची घोषणा केली आहे.
श्रीलंकेत भारतीयांना मिळणार मोफत पर्यटन व्हिसा

कोलंबो : आर्थिक दिवाळखोरीत सापडलेल्या श्रीलंकेने आता देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था ज्या पर्यटनावर आधारित आहे, त्यानुसार आता श्रीलंकेने भारतासहित अन्य सहा देशांना मोफत पर्यटन व्हिसा देण्याची घोषणा केली आहे.

श्रीलंकेच्या कॅबिनेटमध्ये मंगळवारी भारतासहित चीन, मलेशिया, रशिया, जपान, इंडोनेशिया आणि थायलंड या देशांना मोफत व्हिसा देण्यास मान्यता देण्यात आली आहे. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी याबाबतची माहिती दिली आहे.

परराष्ट्र मंत्री अली साबरी म्हणाले की, “हे नियम ३१ मार्च २०२४ पर्यंत तत्काळ प्रभावाने लागू राहतील. श्रीलंकेचे भारतासोबतचे संबंध आमच्या परराष्ट्र धोरणातील सर्वात महत्त्वाचे आहेत. आम्हाला भारतीय चलनाला श्रीलंकेत व्यापार करण्यायोग्य चलन बनवण्याची परवानगी द्यायची आहे. ३०० ते ४०० दशलक्ष भारतीय प्रवासी श्रीलंकेला भेट देत आहेत.”

गेल्या वर्षी श्रीलंकेवर आर्थिक संकट कोसळले. त्यानंतर जेवणाचे पदार्थ, ॲौषधे, स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल-डिझेल तसेच काडीपेटीसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंची टंचाई निर्माण झाली होती. इंधन आणि स्वयंपाकाचा गॅस खरेदी करण्यासाठी श्रीलंकेत लोकांना दुकानाबाहेर कित्येक तास ताटकळत उभे राहावे लागत होते. ही समस्या आताही काही प्रमाणात असली तरी श्रीलंकेने पर्यटनाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताकडून सर्वाधिक पर्यटक

श्रीलंका सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, यंदाच्या सप्टेंबर महिन्यात भारताकडून श्रीलंकेत सर्वाधिक पर्यटक पर्यटनासाठी गेले होते. ३० हजारपेक्षा जास्त भारतीय सप्टेंबर महिन्यात श्रीलंकेत गेले होते, तर सप्टेंबरमध्ये चीनमधून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या ८ हजार इतकी होती. २०१९मध्ये ईस्टरच्या रविवारी श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटात ११ भारतीयांसहित २७० जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर श्रीलंकेतील पर्यटनाला उतरती कळा लागली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in