

जाकार्ता : इंडोनेशियाच्या पूर्वेकडील भागाला गुरुवारी सकाळी ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून उत्तर सुलावेसी प्रांतातील अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर अमेरिकेच्या एका संस्थेने भूकंपाच्या केंद्रापासून १ हजार किलोमीटरच्या परिघात धोकादायक त्सुनामी लाटा निर्माण होण्याची शक्यता वर्तवत इशारा जारी केला होता. परंतु कालांतराने हा इशारा मागे घेण्यात आला.
नुकसानीचा अंदाज नाही
स्थानिक आपत्ती निवारण संस्था आणि इंडोनेशियाच्या शोध आणि बचाव संस्थेने अद्याप अधिकृत नुकसानीचा अंदाज जाहीर केलेला नाही; मात्र, ‘यूएस जिओलॉजिकल सर्व्हे’ने (यूएसजीसी) स्पष्ट केले की, हा भूकंप सुलावेसी आणि मालुकू द्वीपसमूहांच्या दरम्यान असलेल्या ‘मोलुक्का समुद्रा’त जमिनीखाली केवळ ३५ किलोमीटरच्या उथळ खोलीवर पहाटेच्या वेळी झालाय.
यूएसजीसीच्या माहितीनुसार, ज्यांनी सुरुवातीला या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल नोंदवली होती. हा भूकंप स्थानिक वेळेनुसार सकाळी ६.४८ वाजताच्या सुमारास मोलुक्का समुद्रात झाला.
मानाडोत एका व्यक्तीचा मृत्यू
अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूकंपाचे धक्के अत्यंत तीव्रतेने जाणवले. मानाडोच्या परिसरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या एका व्यक्तीच्या पायाला दुखापत झाली. मृत व्यक्ती कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकली होती.
त्सुनामी लाटांची नोंद
इंडोनेशियाच्या ‘बीएमकेजी’ या भूवैज्ञानिक संस्थेनुसार, भूकंपानंतरच्या एका तासाच्या आतच अनेक केंद्रांवर लहान त्सुनामी लाटांची नोंद करण्यात आली. यामध्ये उत्तर मिनाहासा येथे ७५ सेंटीमीटर, बिटुंग येथे २० सेंटीमीटर (८ इंच) आणि पश्चिम हालमाहेरा येथे ३० सेंटीमीटर (एक फूट) उंचीच्या लाटांचा समावेश होता. इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एकामध्ये वसलेला आहे, कारण तो ‘पॅसिफिक रिंग ऑफ फायर’च्या पट्ट्यावर स्थित आहे. हा ज्वालामुखी आणि भूभंग रेषांचा बनलेला ४० हजार किलोमीटर लांबीचा एक विशाल पट्टा आहे, जो पृथ्वीच्या विवर्तनिक पट्ट्यांच्या अभिसरणातून निर्माण झालाय. प्रशांत महासागराला वेढून असलेला हा नालेच्या आकाराचा पट्टा जगातील सुमारे ९० टक्के भूकंपांसाठी कारणीभूत आहे आणि तो येथील सततच्या भूकंपीय आणि ज्वालामुखीविषयक हालचालींसाठी प्रसिद्ध आहे.