इराणमध्ये महागाईचा भडका; खामेनी यांच्याविरोधात आंदोलन, हिंसाचारात ७ जणांचा मृत्यू

इराणमध्ये सध्या महागाईचा भडका उडाल्याने लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असून त्याला हिंसक वळण लागले. या हिंसाचारामध्ये सात जण ठार झाले आहेत. इराणचे र्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्याविरोधात गेल्या आठवड्यापासून आंदोलन सुरू आहे.
इराणमध्ये महागाईचा भडका; खामेनी यांच्याविरोधात आंदोलन, हिंसाचारात ७ जणांचा मृत्यू
Published on

दुबई : इराणमध्ये सध्या महागाईचा भडका उडाल्याने लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असून त्याला हिंसक वळण लागले. या हिंसाचारामध्ये सात जण ठार झाले आहेत. इराणचे र्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्याविरोधात गेल्या आठवड्यापासून आंदोलन सुरू आहे. त्यानंतर सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये तीव्र चकमक उडाली.

अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी इराणवर निर्बंध लादल्याने इराणमध्ये डिसेंबर महिन्यात महागाई ४२.५ टक्क्यांनी वाढली आहे. तसेच इस्रायलबरोबर जूनमध्ये चाललेल्या सात दिवसांच्या संघर्षाचाही इराणच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर इराणमध्ये खामेनी यांना सत्तेवरून हटवण्याची मागणी जोर धरत आहे.

इराणची राजधानी तेहरानमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलनात उतरले असून खामेनी यांच्याविरोधात ‘अयातुल्ला खामेनी मुर्दाबाद’ अशी नारेबाजी करत आहेत. इराणमधील लोर्देगान, कुहदश्त व इस्फहान या शहरांमध्ये झालेल्या हिंसेत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली.आहे. महागाईचा भडका उडाल्याने व्यावसायिकही या आंदोलनात रस्त्यावर उतरले आहेत.

पॅरामिलटरी युनिटचा सहभाग

इराणमधील लोर्देगान शहरात ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स’ व आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसेत दोन आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. तर कुहदश्तमध्ये ‘बासजी पॅरामिलटरी युनिट’ या सुरक्षा दलाच्या एका जवानाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ‘बासजी पॅरामिलटरी युनिट’ ही खामेनी यांच्याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनात सहभागी झाली आहे. त्यामुळे इराणमध्ये सध्या सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. खामेनी यांना सत्तेवरून पदच्युत करण्यासाठी इराणचे एक ‘पॅरामिलटरी युनिट’च आंदोलनाला पाठिंबा देत आहे.

इराणविरुद्ध कारवाईसाठी अमेरिका पूर्णपणे सज्ज

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी आंदोलकांविरोधात बळाचा वापर करण्याच्या मुद्द्यावर इराणला गंभीर इशारा दिला आहे. जर शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या नागरिकांची हत्या केली, तर अमेरिका इराणविरोधात कारवाई करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रूथ’वर पोस्ट करत इराणला इशारा दिला आहे की, जर इराणने शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार केला आणि त्यांची क्रूरपणे हत्या केली, जी त्यांची प्रथाच आहे, तर अमेरिका त्यांच्या मदतीसाठी धावून येईल. आम्ही पूर्णपणे सज्ज आणि तयार आहोत. इराणमध्ये गेल्या तीन वर्षातील सर्वात मोठे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणला हा इशारा दिला आहे. यापूर्वीही ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला होता. इराणने जर क्षेपणास्त्र आणि आण्विक चाचणी कार्यक्रम पुन्हा सुरू केला तर अमेरिका त्यांच्यावर हल्ला करण्यास तयार असेल, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. इराण काय करत आहे याची आपल्याला जाणीव आहे, आशा आहे की, ते त्या दिशेने वाटचाल करणार नाहीत, कारण आम्हाला बी-२ वर (बी-२ बॉम्बर हे अमेरिकेचे लढाऊ विमान आहे) पुन्हा इंधन जाळायचे नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.

logo
marathi.freepressjournal.in