इस्रायल-हमास युद्धामुळे महागाईचा धोका; जागतिक बँकेचा इशारा

१९७० नंतर प्रथमच जिन्नस बाजारांवर असा ताण निर्माण झाला आहे, असे इंदरमीत गील यांनी सूचित केले आहे.
इस्रायल-हमास युद्धामुळे महागाईचा धोका;
जागतिक बँकेचा इशारा

न्यूयॉर्क : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध संपूर्ण आखाती प्रदेशात पसरले, तर त्यामुळे खनिज तेल आणि कृषी उत्पादनांच्या किमती आकाशाला भिडण्याची शक्यता आहे, अशी भीती जागतिक बँकेने व्यक्त केली आहे. जागतिक बँकेचे अर्थतज्ज्ञ इंदरमीत गील यांनी म्हटले आहे की, हे युद्ध चिघळेल तर जागतिक अर्थव्यवस्थेत गेल्या काही दशकांमधील पहिलाच ऊर्जेचा दुप्पट धक्का बसेल. एक आखातातील युद्ध आणि दुसरे युक्रेन युद्ध यामुळे तेलाच्या किमती झपाट्याने वाढतील.

हमास-इस्रायल संघर्ष सुरू होताच खनिज तेलाच्या दरात आधीच सहा टक्के वाढ झाली आहे. हमास दहशतवाद्यांनी गाझातून इस्रायलमध्ये घुसखोरी केली आणि १४०० इस्रायली नागरिकांना ठार केले तसेच २४५ जणांना ओलीस ठेवले. त्यानंतर इस्रायलने हमासचे अड्डे असलेल्या गाझा पट्टीवर बेछूट हल्ले सुरू केले. त्यात सुमारे ८ हजार पॅलेस्टिनी ठार झाले. मृतांमध्ये निम्मी संख्या मुलांची आहे. रशिया आणि युक्रेन यांचे युद्ध सुरू झाल्यामुळे जागतिक बाजारांवर आधीच ताण होता. त्यात आता इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरू झाल्यामुळे ताण दुप्पट झाला आहे.

पन्नास वर्षांत प्रथमच बाजारावर ताण

१९७० नंतर प्रथमच जिन्नस बाजारांवर असा ताण निर्माण झाला आहे, असे इंदरमीत गील यांनी सूचित केले आहे. यामुळे तेलाच्या दरात ३ ते १३ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. याचा अर्थ तेलाचा प्रतिपिंप दर ९३ डॉलर्सवरून १०२ पर्यंत जाऊ शकते. तेल वाढल्याने वाहतूक खर्च वाढून सर्वच जिनसांचे भाव वाढतील. तेव्हा धोरणकर्त्यांनी सावध राहण्याची गरज आहे.

logo
marathi.freepressjournal.in