'ब्रम्होस'ने सुसज्ज INS Imphal नौदलाच्या ताफ्यात ; एका दमात 15,000 किमीचा पल्ला, बघा वैशिष्ट्ये काय?

विशाखापट्टनम वर्गातील युद्धनौकांप्रमाणेच आयएनएस इम्फाळची रचना आहे. या युद्धनौकेची एकूण लांबी १६३ मीटर असून, वजन तब्ब्ल सात हजार ४०० टन एवढे आहे
'ब्रम्होस'ने सुसज्ज INS Imphal नौदलाच्या ताफ्यात ; एका दमात 15,000 किमीचा पल्ला, बघा वैशिष्ट्ये काय?
PM

मुंबई : चीनचे समुद्रातील वाढते वर्चस्व आणि युद्धनौकांचा संचार, भारताच्या जवळ समुद्रातील जलवाहतूक आणि वाढता व्यापार लक्षात घेता भारतीय नौदलाच्या ताफ्यात विविध युद्धनौकांचा समावेश गेल्या काही वर्षात वेगाने होत आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस इम्फाळ ही विनाशिका युद्धनौका मंगळवारी मुंबईत दाखल झाली.

या निमित्ताने मुंबईत झालेल्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत इम्फाळ युद्धनौकेवर पहिल्यांदाच नौदलाचा ध्वज सन्मानपूर्वक फडकवण्यात आला. याआधीच गेल्या दोन वर्षात विशाखापट्टनम वर्गातील आयएनएस विशाखापट्टनम आणि मोरमुगाओ या दोन विनाशिका प्रकारातील युद्धनौका दाखल झाल्या आहेत. इम्फाळमुळे नौदलाच्या संचार आणि मारक क्षमतेत मोलाची भर पडली आहे.

आयएनएस इम्फाळची वैशिष्ट्ये

विशाखापट्टनम वर्गातील युद्धनौकांप्रमाणेच आयएनएस इम्फाळची रचना आहे. या युद्धनौकेची एकूण लांबी १६३ मीटर असून, वजन तब्ब्ल सात हजार ४०० टन एवढे आहे. खोल समुद्रात ही युद्धनौका जास्तीत जास्त ताशी ५६ किलोमीटर या वेगाने संचार करू शकते. इंधन भरल्यावर एका दमात १५ हजार किलोमीटरचा पल्ला गाठण्याची या युद्धनौकेची क्षमता आहे. इम्फाळवर एका वेळी ५० अधिकारी आणि २५० नौसैनिक कार्यरत असतील.

ब्रम्होस असणार प्रमुख शस्त्र -

इम्फाळवर सर्वात महत्त्वाचे असे इल/एम-२२४८ एमएफ स्टार नावाचे शक्तीशाली रडार आहे. यामुळे सर्व बाजूंना समुद्राच्या पृष्ठभागावर ३०० किलोमीटर अंतरावरील हालचाल सहज टिपता येणार आहे. तसंच विविध प्रकारच्या रडारमुळे ४०० किलोमीटर अंतरावरून हवेतून येणाऱ्या लक्ष्यावर नजर ठेवण्याची क्षमता या युद्धनौकेला प्राप्त झाली आहे. ७० किलोमीटर अंतरावरील हवेतील कोणतेही लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेले बराक ८ क्षेपणास्त्र यावर तैनात आहे, तर ३०० किलोमीटर अंतरावरील समुद्रातले किंवा जमिनीवरचे लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेले ब्रम्होस ही युद्धनौकेवरील प्रमुख शस्र आहे. तसेच पाणबुडी विरोधी क्षेपणास्त्रे, पाणतीर, अगदी जवळ आलेल्या लक्ष्याला भेदणारी प्रणाली यावर तैनात आहे.

logo
marathi.freepressjournal.in