बांगलादेशात अंतरिम सरकारचा आज शपथविधी

Nobel Laureate Muhammad Yunus: नोबेल पुरस्कार विजेते प्रा. मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्यात येणार असून गुरुवारी या सरकारचा शपथविधी होणार आहे, असे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमन यांनी बुधवारी जाहीर केले.
बांगलादेशात अंतरिम सरकारचा आज शपथविधी
PTI
Published on

ढाका : नोबेल पुरस्कार विजेते प्रा. मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्यात येणार असून गुरुवारी या सरकारचा शपथविधी होणार आहे, असे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमन यांनी बुधवारी जाहीर केले.

प्रा. युनुस यांच्या सल्लागार परिषदेत १५ सदस्य असतील. बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी प्रा. युनुस यांची अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्ती करीत असल्याचे मंगळवारी जाहीर केले होते.

दरम्यान, बांगलादेशातील अंतरिम सरकारचे नियोजित प्रमुख युनुस यांनी देशातील जनतेला शांतता राखण्याचे आणि सर्व प्रकारच्या हिंसाचारापासून दूर राहण्याचे ‌आवाहन केले आहे. नव्या विजयाचा उत्सव आपण साजरा करूया, आपल्या कोणत्याही चुकीमुळे या नव्या विजयाच्या आनंदावर विरजण पडू देऊ नका, असेही युनुस यांनी म्हटले आहे. प्रा. युनुस नेतृत्वाची धुरा सांभाळण्यासाठी पॅरिसहून परतणार आहेत.

शेख हसीना यांच्या २९ समर्थकांची हत्या

माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या २९ समर्थकांचे मृतदेह मंगळवारी बांगलादेशात ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे देशातील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता ४६९ वर पोहोचली आहे.

अद्याप काही काळ हसीनांचे वास्तव्य दिल्लीतच - साजीब

बांगलादेशात सरकारविरोधात हिंसक आंदोलन झाल्यानंतर भारतामध्ये आलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना या अजून काही काळ दिल्लीतच वास्तव्य करणार असल्याचे त्यांचे पुत्र साजीब वाझेद जॉय यांनी बुधवारी येथे सांगितले.

हसीना बांगलादेशातून परागंदा झाल्यानंतर सोमवारी दिल्लीजवळच्या हवाई तळावर उतरल्या. हसीना आणि त्यांची बहीण शेख रेहाना यांना दिल्लीतील सुरक्षितस्थळी कडेकोट बंदोबस्तात हलविण्यात आले आहे. हसीना अन्य कोणत्या देशात आश्रय घेणार का, याबाबत साजीद यांच्याशी व्हिडीओद्वारे संपर्क साधण्यात आला असता त्यांनी त्या अफवा असल्याचे स्पष्ट केले. हसीना यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, काही काळ त्या दिल्लीतच वास्तव्य करणार आहेत, आपली बहीण त्यांच्यासमवेत आहे, त्या एकट्या नाहीत, असे साजीद यांनी सांगितले.

हसीना यांची कन्या सायमा वाझेद या जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्राच्या प्रादेशिक संचालक असून त्याचे मुख्यालय दिल्लीतच आहे. रेहाना यांची कन्या तुलीप सिद्दीक या ब्रिटिश पार्लमेंटच्या सदस्या आहेत.

खलिदा झिया यांना नवा पासपोर्ट

माजी पंतप्रधान खलिदा झिया यांची कारागृहातून सुटका करण्यात आल्यानंतर त्यांना नवा पासपोर्ट देण्यात आला आहे. झिया यांना नवा पासपोर्ट देण्यात आल्याचे बांगलादेश नॅशनल पार्टीचे माध्यमविभाग सदस्य शैरूल कबीर खान यांनी सांगितले.

पोलिसांना सेवेत हजर राहण्याचे आदेश

हिंसाचारग्रस्त भागातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांनी सेवेत हजर राहावे, असे आदेश उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनी काढले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस सेवेत हजर नसल्याने विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून सलग दुसऱ्या दिवशी वाहतुकीचे व्यवस्थापन केले.

खलिदा झियांचे आवाहन

देशाच्या पुनर्बांधणीसाठी सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन खलिदा झिया यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले आहे. आता आपली सुटका झाली आहे, आता विध्वंस नको, सूड नको, बदला नको, आता फक्त प्रेम आणि शांतता हवी आहे, असे झिया म्हणाल्या.

भारतीय दूतावासातील काही कर्मचारी मायदेशी

ढाका येथील भारतीय दूतावासातील अनावश्यक कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय बुधवारी मायदेशात परतले. तथापि, सर्व भारतीय राजनैतिक अधिकारी ढाका येथून आपले कर्तव्य बजावत आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. बांगलादेशच्या विविध भागात अद्यापही चकमकी सुरू असल्याने अनावश्यक कर्मचारी मायदेशात परतले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in