इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला; २४ जणांचा मृत्यू; खामेनी बंकरमध्ये लपले?

इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा भडका सोमवारी चौथ्या दिवशीही सुरू असून सोमवारी इराणने इस्रायलवर केलेल्या हवाई हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सध्या इस्रायलने इराणची राजधानी तेहरानला लक्ष्य केले असून इराणनेही इस्रायलमधील जेरुसलेम व तेल अवीवसह अनेक शहरांवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली आहेत. या दोन्ही देशांतील संघर्षामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस होत असल्याचे समोर येत आहे.
इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला; २४ जणांचा मृत्यू; खामेनी बंकरमध्ये लपले?
Published on

तेहरान/तेल अवीव : इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा भडका सोमवारी चौथ्या दिवशीही सुरू असून सोमवारी इराणने इस्रायलवर केलेल्या हवाई हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

सध्या इस्रायलने इराणची राजधानी तेहरानला लक्ष्य केले असून इराणनेही इस्रायलमधील जेरुसलेम व तेल अवीवसह अनेक शहरांवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली आहेत. या दोन्ही देशांतील संघर्षामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस होत असल्याचे समोर येत आहे. आता सोमवारी सकाळी इराणने इस्रायलवर पुन्हा एकदा सर्वात मोठा हवाई हल्ला केला. यात इराणच्या सैन्याने इस्रायलच्या काही भागात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती समोर येत आहे.

इराणने इस्रायलवर केलेल्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या २४ वर पोहोचली आहे. इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यात शुक्रवारपासून इस्रायलमध्ये किमान २४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, इराण आणि इस्रायलमधील संघर्ष सध्याही सुरू असून दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती आहे.

भारताकडून मार्गदर्शक सूचना जारी

इराण-इस्रायल संघर्ष वाढल्याने भारताने अलर्ट होत तेथील आपल्या नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. तेहरानमधील भारतीय दूतावासाने रविवारी या प्रदेशातील भारतीय नागरिकांसाठी एक सूचना जारी केली आहे. एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय दूतावासाने आपत्कालीन परिस्थितीत भारतीय नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करून भारतीय नागरिक आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधू शकतात, अशी माहिती भारतीय दूतावासाने दिली आहे.

खामेनी लपले बंकरमध्ये?

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे त्यांचे घर सोडून एका बंकरमध्ये राहत आहेत. इस्रायलकडून सतत होणाऱ्या हवाई हल्ल्यांमुळे इराणी सैन्याने खामेनी यांना ईशान्य तेहरानमधील एका भूमिगत बंकरमध्ये नेले आहे. खामेनी आणि त्यांच्या कुटुंबालाही त्याच बंकरमध्ये ठेवण्यात आले आहे. शुक्रवारपासून इस्रायल इराणच्या प्रमुख शहरांमध्ये हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये विशेषतः इराणच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाला लक्ष्य करण्यात आले आहे. इराणला भीती आहे की, इस्रायल खामेनींवरही हल्ला करू शकते.

१० हजार भारतीय अडकले

भारत सरकारने इराणमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले की, तेथील भारतीय विद्यार्थ्यांना आणि इतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चौथ्या दिवशी इराणने इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे देशातील हवाई सेवा पूर्णतः बंद करण्यात आली असून, सुमारे १० हजार भारतीय नागरिक सध्या इराणमध्ये अडकले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in