

तेहरान : इराणने भारत आणि चीन व रशियासह इतर अनेक मित्र देशांना व्यावसायिक जहाजांसाठी हॉर्मुझची सामुद्रधुनी वापरण्याची परवानगी दिली आहे, असे इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी जाहीर केले आहे. यामुळे भारतातील तेल व गॅसपुरवठा सुरळीत होण्याची आशा निर्माण झाली आहे. तसेच भारतातून आखातात निर्यात होणाऱ्या मालाची वाहतूकही मार्गी लागेल अशी शक्यता आहे.
इराणने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीची कोंडी केल्यामुळे जागतिक तेल आणि वायूच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पर्शियन आखात आणि ओमानचे आखात यांच्यामधील हा एक अरुंद समुद्री मार्ग आहे, जिथून जगातील सुमारे २० टक्के तेल आणि एलएनजी (द्रवीकृत नैसर्गिक वायू) ची वाहतूक होते. पश्चिम आशिया हा भारताच्या ऊर्जा खरेदीचा एक प्रमुख स्रोत राहिला आहे.
इराणी सरकारी टीव्हीनुसार, अराघची म्हणाले, “आम्ही ज्या देशांना मैत्रीपूर्ण मानतो अशा काही देशांना (हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून) जाण्याची परवानगी दिली आहे. आम्ही चीन, रशिया, भारत, इराक आणि पाकिस्तानला या मार्गावरून प्रवास करण्याची मुभा दिली आहे.”
त्याचवेळी, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे स्पष्ट केले की, इराणच्या शत्रूंशी संबंधित असलेल्या जहाजांना मात्र या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
ते म्हणाले, “आम्ही ऐन युद्धात आहोत. हा प्रदेश आता युद्धक्षेत्र आहे आणि आमच्या शत्रूंच्या आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या जहाजांना येथून जाऊ देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु इतरांसाठी हा मार्ग आता खुला आहे.”
संघर्ष संपवण्यासाठी काही तिसऱ्या देशांकडून मध्यस्थी म्हणून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा संदर्भ देताना ते म्हणाले, "अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा सुरू नाही." मेहर न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी मुलाखतीत पुढे सांगितले की, या प्रदेशातील अनेक परराष्ट्रमंत्र्यांनी तेहरानशी संपर्क साधला आहे, परंतु इराणची याबाबतची भूमिका 'तत्वनिष्ठ आणि ठाम' राहिली आहे. यापुढे कोणीही इराणी लोकांशी युद्ध करण्याचे धाडस करणार नाही," असा दावाही त्यांनी यावेळी केला.