

तेहरान/तेल अवीव : होर्मुझची सामुद्रधुनी इस्रायल, अमेरिका, युरोपियन देश आणि अमेरिकेचे सहयोगी देश यांच्यासाठी बंद असेल, मात्र इतर देशांना या मार्गाने वाहतूक सुरू ठेवण्यास इराणने परवानगी दिली आहे. हा भारतासाठी मोठा दिलासा मानला जात आहे, कारण आता चीनप्रमाणेच भारतही या मार्गाने इंधनाची वाहतूक करू शकणार आहे. त्यामुळे देशात संभाव्य इंधन टंचाईचा धोका कमी झाला आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सकडून (आयआरजीसी) ही घोषणा करण्यात आली आहे.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सकडून बुधवारी मोठी घोषणा करण्यात आली होती. चीन वगळता इतर सर्व देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी बंद राहील, जर या सामुद्रधुनीमधून चीन सोडता अन्य कोणत्याही देशाच्या तेलाचे जहाज गेले तर आम्ही त्यावर मिसाईल हल्ला करू, असे इराणने म्हटले होते. याचा मोठा फटका हा भारतालाही बसणार होता, कारण जगभरात जेवढी कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील तब्बल २५ टक्के तेलाची वाहतूक याच होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून होते.
इराणने या मार्गाविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना असेही म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार युद्धकाळात हा मार्ग बंद करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोठी घोषणा केली होती. अमेरिकेचे सैन्य या मार्गाला सुरक्षा पुरवेल मी जगाला शब्द देतो की कोणत्याही देशात इंधन टंचाई निर्माण होणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, आता इराणने भारतासाठी हा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे भारतात होणारा इंधन पुरवठा सुरळीत सुरू राहण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या तेल टँकरवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला
अमेरिकेने श्रीलंकेजवळ इराणची युद्धनौका बुडविल्यानंतर आता इराणनेही अमेरिकेला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. इराणने अमेरिकेच्या तेल टँकरला उत्तर पर्शियन आखातामध्ये लक्ष्य केले असून सध्या ते जळत आहे, असा दावा इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) केला आहे. त्यामुळे आखातामधील जहाजांना धोका निर्माण झाला आहे. जमिनीवर सुरू असलेला संघर्ष आता समुद्रापर्यंत पोहोचला आहे.
इस्रायल-इराण युद्ध लवकर संपले पाहिजे - मोदी
मध्य पूर्व आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध लवकर संपवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. कायद्याचे राज्य, संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीवर भारत विश्वास ठेवतो, लष्करी संघर्ष हा कोणत्याही समस्येवरील तोडगा नाही, लष्करी संघर्षातून कोणताही प्रश्न सुटू शकत नाही, असेही पंतप्रधान म्हणाले. फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्यासोबतच्या द्विपक्षीय चर्चेनंतर मोदी यांनी वरील विधान केले. भारत आणि फिनलंड दोन्ही देश कायद्याचे राज्य, संवाद आणि मुत्सद्देगिरीवर विश्वास ठेवतात. केवळ लष्करी संघर्षातून कोणतीही समस्या सुटू शकत नाही, यावर आमचे एकमत आहे, असे मोदी म्हणाले.
भारताने प्रथमच खामेनींच्या निधनावर व्यक्त केला शोक
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा गुरुवारी सहावा दिवस असून भारताने पहिल्यांदाच खामेनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारत सरकारच्या वतीने परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणी दूतावासाला भेट देऊन अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी करून श्रद्धांजली वाहिली. खामेनी यांच्या निधनानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये शोक संदेश पाठवले जात आहेत. खामेनी यांचा २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायल हल्ल्यात मृत्यू झाला होता. इराणने एक दिवसानंतर अधिकृतपणे याची घोषणा केली.