इराणचा इस्रायलवर हल्ला; ९९ टक्के क्षेपणास्त्रे व ड्रोन हवेतच नष्ट केल्याचा इस्रायलचा दावा

इराणने आजवर इस्रायलवर केलेला हा पहिलाच थेट हल्ला, पश्चिम आशियातील (मध्य-पूर्वेतील) संघर्ष आणखी चिघळण्याची भीती; भारताकडून चिंता व्यक्त
इराणचा इस्रायलवर हल्ला; ९९ टक्के क्षेपणास्त्रे व ड्रोन हवेतच नष्ट केल्याचा इस्रायलचा दावा

तेल अवीव : इस्रायलच्या सेनादलांनी पंधरवड्यापूर्वी सीरियातील दमास्कस येथील इराणच्या वकिलातीवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणने रविवारी पहाटे इस्रायलवर ३०० क्षेपणास्त्रे व ड्रोनच्या सहाय्याने हल्ला केला. इराणने आजवर इस्रायलवर केलेला हा पहिलाच थेट हल्ला आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील (मध्य-पूर्वेतील) संघर्ष आणखी चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे.

रविवारी पहाटे इराणसह इराक, सीरिया आणि येमेनमधून इस्रायलवर सुमारे ३०० ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागण्यात आली. इस्रायलने अमेरिका आणि ब्रिटनच्या मदतीने त्यापैकी साधारण ९९ टक्के ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे. इराण आणि त्याच्या मित्र गटांनी डागलेली मोजकीच क्षेपणास्त्रे आणि ड्रोन प्रत्यक्ष इस्रायलच्या भूमीवर पोहोचू शकली आणि त्याने किरकोळ नुकसान झाल्याचे इस्रायलने म्हटले आहे. या हल्ल्यात सात वर्षांच्या एका मुलीसह १२ जण जखमी झाल्याचे इस्रायलच्या सेनादलांनी सांगितले. गाझा पट्टीतील ‘हमास’ या संघटनेने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यापासून इस्रायल आणि इराण यांच्यामधील संबंध बरेच ताणले गेले आहेत. गाझातील हमास, लेबॅनॉनमधील हिजबुल्ला, येमेनमधील हुथी आदी संघटनांना इराणचा पाठिंबा आहे आणि त्या इस्रायलच्या विरोधात लढत आहेत.

इस्रायलच्या सेनादलांनी १ ऑगस्ट रोजी सीरियातील दमास्कस येथील इराणच्या वकिलातीवर केलेल्या हल्ल्यात इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेले. त्यामुळे संतप्त झालेल्या इराणने इस्रायलवर थेट हल्ल्याचा इशारा दिला होता. तेव्हापासून आखाती प्रदेशातील वातावरण अधिकच स्फोटक बनले होते. दोन्ही देशांत युद्ध सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात होती. रविवारच्या हल्ल्यानंतर ती शक्यता आणखी बळावली आहे.

दोन्ही बाजूंनी अरेरावीची भाषा

'इराणबरोबरचा संघर्ष अद्याप संपलेला नाही’, असे म्हणत इस्रायलचे संरक्षणमंत्री योआव गॅलंट यांनी प्रतिहल्ल्याचा इशारा दिला आहे. तर इस्रायल आणि अमेरिकेने पुन्हा काही आगळीक केल्यास त्याला असेच चोख उत्तर दिले जाईल, असा इशारा इराणने दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी इस्रायलला पाठिंबा व्यक्त केला आहे. मात्र, जगातील अनेक देशांच्या नेत्यांनी इराणच्या हल्ल्याचा निषेध केला आहे.

क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा यशस्वी

‘हमास’ने ७ ऑक्योबर २०२३ रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात एकाच वेळी शेकडो रॉकेट्स डागली होती. त्यापैकी बरीच रॉकेट्स लक्ष्यांवर पोहोचली होती. त्यावेळी इस्रायलची प्रसिद्ध ‘आयर्न डोम’ नावाची क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा विफल झाल्याचे चित्र दिसत होते. रविवारच्या हल्ल्यावेळी मात्र इस्रायलच्या आयर्न डोम, डेव्हिड्स स्लिंग आणि अॅरो या क्षेपणास्त्रभेदी यंत्रणांनी चांगले काम करून बहुतांश ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच पाडली. त्यात इस्रायलला अमेरिका आणि ब्रिटनची मदत लाभली. ब्रिटनच्या टायफून लढाऊ विमानांनी काही ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे पाडली. तर जॉर्डनने त्यांच्या हवाई हद्दीतून जाणारी काही क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडले.

भारताकडून चिंता व्यक्त

“इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या शत्रुत्वाबद्दल आम्हाला गंभीर चिंता वाटत असून, या प्रदेशातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन करत आहोत. आम्ही सध्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. या प्रदेशात सुरक्षा आणि स्थिरता राखणे अत्यावश्यक आहे”, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यासंदर्भात ‘एक्स’वर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in