
तेहरान : इराणच्या बंदर अब्बास शहरातील प्रमुख राजाई बंदरात शनिवारी भीषण स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे हाहाकार उडाला. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला असून किमान १८ जणांचा मृत्यू तर तब्बल ७५० हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे. राजाई बंदर हे इराणमधील प्रमुख बंदरांपैकी एक आहे.
भीषण स्फोटानंतर आकाशात आग आणि धुराचे मोठाले लोळ उठताना दिसले. स्फोटाची तीव्रता इतकी होती की परिसरातील अनेक किलोमीटरपर्यंत घरांच्या आणि कार्यालयांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, क्षेपणास्त्र इंधनासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक घटकांच्या एका शिपमेंटमुळे हा स्फोट झाला असावा अशी शक्यता आहे. इराणच्या संकट व्यवस्थापन संघटनेचे प्रवक्ते होसैन झाफारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदर अब्बासमधील शाहिद राजाई सेक्शनमध्ये रासायनिक कंटेनर योग्य पद्धतीने न साठवल्यामुळे हा स्फोट झाल्याची शक्यता आहे. मात्र, इराण सरकारच्या प्रवक्त्यांनी रसायनच स्फोटाचे कारण असल्याच्या वृत्तास दुजोरा देण्यास नकार दिला आहे.
बंदरात केमिकल पोहोचले होते, खासगी सिक्युरिटी फर्मचा दावा
मार्च महिन्यात बंदर अब्बास बंदरात क्षेपणास्त्र इंधनासाठी आवश्यक असलेल्या रसायनाचा एक शिपमेंट पोहोचला होता, असे खासगी सुरक्षा संस्था अँम्ब्रेने म्हटले असल्याचे वृत्त 'असोसिएटेड प्रेस'ने दिले आहे. चीनकडून दोन जहाजांमार्फत Ammonium Perchlorate चे शिपमेंट इराणला पाठवले गेले होते. हे केमिकल प्रामुख्याने रॉकेटच्या घन इंधनासाठी वापरले जाते आणि इराणच्या इस्रायलसोबतच्या संघर्षात खर्ची पडलेल्या क्षेपणास्त्र साठ्याच्या भरपाईसाठी वापरले जाणार होते. "ही आग घन इंधनाच्या शिपमेंटच्या चुकीच्या हाताळणीमुळे लागली असल्याची माहिती आहे, हे इंधन इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी वापरण्यात येणार होते," असे अँम्ब्रेने म्हटले आहे. मात्र इराणने अधिकृतरित्या अशा कोणत्याही शिपमेंटच्या प्राप्तीची कबुली दिलेली नाही. दरम्यान, इराणच्या अध्यक्षांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आग विझविण्यासाठी आणि ती इतर भागात पसरू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
स्फोट आणि अमेरिका-इराण चर्चा
शनिवारी इराण आणि अमेरिकेत ओमानमध्ये अणु चर्चेची तिसरी टप्पा सुरू केला असतानाच हा स्फोट झाला. परंतु दोन्ही घटनांमध्ये संबंध असल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. इराणमध्ये कोणत्याही अधिकृत व्यक्तीने हा स्फोट हल्ला असल्याचा थेट आरोप देखील केलेला नाही. तथापि, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी बुधवारी, भूतकाळातील घटनांमुळे आमच्या सुरक्षा सेवा उच्च सतर्कतेवर आहेत, असे म्हटले आहे.