
तेहरान/तेल अवीव : इस्रायलने रविवारी सलग तिसऱ्या दिवशी इराणवर हवाई हल्ले चढवले आणि आणखी मोठ्या कारवाईचा इशारा दिला. दरम्यान, काही इराणी क्षेपणास्त्रे इस्रायली हवाई संरक्षण व्यवस्था चुकवून देशाच्या मध्यवर्ती भागातील इमारतींना धडकली. तसेच इस्रायलच्या हैफा बंदर व रिफायनरीवरही इराणने क्षेपणास्त्र हल्ला केला. दरम्यान, इराणच्या अणुकार्यक्रमावरील नियोजित चर्चा रद्द करण्यात आली आहे.
इराणने म्हटले की, इस्रायलने दोन तेल शुद्धीकरण कारखाने लक्ष्य केले, ज्यामुळे इराणच्या आधीच निर्बंधग्रस्त ऊर्जा उद्योगावर मोठा आघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, जागतिक बाजारात तेलाच्या दरावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, इस्रायली लष्कराने समाजमाध्यमांवरून इराणी शस्त्रास्त्र कारखाने रिकामे करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारी इराणची राजधानी तेहरानमध्ये पुन्हा स्फोटाचे आवाज ऐकू आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या कारवाईला पूर्ण पाठिंबा दिला असून इराणला नवीन अणुकरार मान्य करूनच पुढील विध्वंस टाळता येईल, असा इशारा दिला आहे.
इराणी परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी रविवारी म्हटले की, जर इस्रायली हल्ले थांबले, तर आम्हीही हल्ले थांबवू. या हल्ल्यांमध्ये अमेरिका सहभागी आहे आणि तिला त्याची जबाबदारी घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
इराणच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूतांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ७८ लोक मृत्युमुखी पडले असून ३२० हून अधिक जखमी झाले आहेत.
हल्ल्यात इस्रायलमध्ये आतापर्यंत १३ ठार
इस्रायलमध्ये शनिवारी रात्री व रविवारी सकाळी इराणच्या हल्ल्यांत किमान १० लोक ठार झाले, असे इस्रायली मदतसंस्था ‘मगेन डेव्हिड अडोम’ने सांगितले. आतापर्यंत इस्रायलमधील एकूण मृत्यू संख्या १३ झाली आहे. इस्रायलमधील बॅट याम शहरात एका इमारतीवर क्षेपणास्त्र आपटल्यानंतर किमान सहा जण ठार झाले. यामध्ये १० वर्षांचा मुलगा आणि ९ वर्षांची मुलगी यांचाही समावेश आहे. हल्ल्यांत १८० लोक जखमी झाले असून सात जण अजूनही बेपत्ता आहेत. इस्रायलचे मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हवाई हद्द सलग तिसऱ्या दिवशीही बंद होती.
इराणच्या संरक्षण मंत्रालयावर हल्ला
इस्रायलने रविवारी सकाळी इराणच्या संरक्षण मंत्रालयावर हल्ला केला. यापूर्वी इस्रायलने तेथील हवाई संरक्षण यंत्रणा, लष्करी तळ व अणुकार्यक्रमाशी संबंधित स्थळांवर लक्ष्य करण्यात आले होते.
‘आयडीएफ’ कर्नल अविकाय अद्री यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, शस्त्रास्त्र कारखान्यांजवळ राहणे इराणी लोकांसाठी धोकादायक ठरू शकते. इस्रायलचा दावा आहे की, त्यांनी तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाला लक्ष्य केले आहे. याशिवाय तेहरान आणि बुशेहरमध्ये तेल डेपो आणि गॅस रिफायनरीसह १५० हून अधिक ठिकाणे उद्ध्वस्त झाली आहेत.
इस्रायली हल्ल्यांमुळे इराणमध्ये १३८ लोकांचा मृत्यू
गेल्या तीन दिवसांत इस्रायली हल्ल्यांमुळे इराणमध्ये १३८ लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात ९ अणुशास्त्रज्ञ आणि २० हून अधिक इराणी कमांडर आहेत. तसेच ३५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. इराणची राजधानी तेहरानसह ७ राज्यांमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. दरम्यान, इराणने आतापर्यंत ३ इस्रायली एफ-३५ विमाने पाडल्याचा दावा केला आहे. इस्रायलने हल्ले थांबवले तर इराणही ते थांबवेल, असे इराणने म्हटले आहे. तथापि, यावर इस्रायलकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही.