Iran Israel War : इस्रायली हल्ल्यात इराणचे गुप्तचर मंत्री ठार

इराणचे गुप्तचरमंत्री इस्माईल खतीब यांचा हवाई हल्ल्यात खात्मा केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इराणच्या सत्ताकेंद्रावरील हा थेट हल्ला असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पाझाश्कियान यांनी खतीब हल्ल्यात ठार झाल्याच्या वृत्ताला अधिकृतपणे दुजोरा दिला असून, ही एक भ्याड हत्या असल्याचे म्हटले आहे.
इस्रायली हल्ल्यात इराणचे गुप्तचर मंत्री ठार
इस्रायली हल्ल्यात इराणचे गुप्तचर मंत्री ठारX
Published on

तेहरान/तेल अवीव : इराणचे गुप्तचरमंत्री इस्माईल खतीब यांचा हवाई हल्ल्यात खात्मा केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इराणच्या सत्ताकेंद्रावरील हा थेट हल्ला असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पाझाश्कियान यांनी खतीब हल्ल्यात ठार झाल्याच्या वृत्ताला अधिकृतपणे दुजोरा दिला असून, ही एक भ्याड हत्या असल्याचे म्हटले आहे.

पाझाश्कियान यांनी सांगितले की, हा हल्ला इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष्य करण्याच्या कटाचा एक भाग होता. यापूर्वी, इस्त्रायलने इराणचे सुरक्षा अधिकारी अली लारीजानी आणि बसिज कमांडर गुलामरेझा सोलतानी यांना लक्ष्य करून दोन्ही अधिकाऱ्यांना ठार केले होते.

दरम्यान, इस्रायलने इराणच्या ऊर्जा सुविधांवरही मोठा हल्ला केला आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनुसार, अमेरिका आणि इस्रायलने दक्षिण इराणमधील असलुयेह शहरातील दक्षिण पार्स गॅस क्षेत्र आणि तेल व वायू सुविधांवर हवाई हल्ले केले.

याला प्रत्युत्तर म्हणून, इराणने आखाती देशांवर मोठ्या हल्ल्यांचा इशारा दिला आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉप्सने लोकांना सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कतारमधील प्रमुख तेल आणि वायू सुविधांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. कतारने इराणच्या गॅस क्षेत्रावरील हल्ल्याचा निषेध केला आहे.

इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर 'बंकर बस्टर' बॉम्बहल्ले अमेरिकन सैन्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील इराणच्यादक्षिण किनारपट्टीवरील क्षेपणास्त्र तळांवर जोरदार हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये ५,००० पौंड (२,२०० किलो) वजनाच्या अनेक 'बंकर-बस्टर' बॉम्बचा वापर करण्यात आला असल्याचा दावा लष्करी कमांडने केला आहे. यामुळे इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आणखी वाढला आहे.

चीनला जाणारी रशियन तेलाची ७ जहाजे भारताकडे वळली

रशियाच्या बालिक समुद्रातून निघालेले 'अक्वा टायटन' हे चीनच्या रिझाओ बंदराकडे जाणारे जहाज आता मार्ग बदलून २१ मार्च रोजी भारतात येणार आहे. भारताने अचानक रशियाकडून तेल खरेदी वाढवली आहे, त्यामुळे हा बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे जहाज मंगळुरूला येणार आहे. चीनला जाणारी रशियन तेलाची सात जहाजे भारताकडे वळविण्यात आली आहेत. भारताच्या जवळपास सर्व मोठ्या रिफायनरीज रशियन तेल खरेदी करत आहेत. याच कारणामुळे जी जहाजे आधी चीनला जात होती, आता आपला मार्ग बदलून भारताकडे येत आहेत.

भारताची इराणला वैद्यकीय मदत

भारताने युद्धजन्य परिस्थितीत इराणला औषधे आणि वैद्यकीय साहित्याची पहिली खेप पाठविली आहे. तेहरानमधील 'इराणी रेड क्रिसेंट सोसायटी'ला ही मदत सुपूर्द करण्यात आली असून, इराणने या मदतीबद्दल भारताचे आभार मानले आहेत. भारत सरकारकडून इराणला औषधे आणि जीवनावश्यक वैद्यकीय साहित्य पाठवण्यात आले आहे. सध्याच्या तणावपूर्ण युद्धस्थितीत भारताने ही मानवतावादी दृष्टिकोनातून ही मदत केली आहे.

'जग लाडकी' जहाज मुंद्रा बंदरात दाखल

भारतीय ध्वज असलेला कच्च्या तेलाचा टँकर असलेले 'जग लाडकी' हे जहाज बुधवारी गुजरातच्या मुंद्रा येथे यशस्वीरित्या दाखल झाले. यामुळे देशाच्या ऊर्जा आयातीत महत्त्वपूर्ण भर पडली आहे. हे जहाज अंदाजे ८०,८८६ मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन बंदरावर पोहोचले आहे. हा माल संयुक्त अरब अमिरातीमधून आणण्यात आला होता आणि फुजैरा बंदरावर चढवण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in