इराणचा इस्त्रायलला दणका! 'मोसाद'च्या मुख्यालयावर हल्ला; इस्त्रायली हल्ल्यात इराणचे नवीन युद्धप्रमुख ठार
तेहरान/तेल अवीव : इस्रायल आणि इराणमध्ये सलग पाचव्या दिवशीही संघर्ष सुरू आहे. इराणने मंगळवारी तेल अवीव येथील इस्रायलची शक्तीशाली गुप्तहेर संघटना 'मोसाद'च्या मुख्यालयावर व लष्करी गुप्तचर यंत्रणा 'अमान' यांच्या इमारतीवर हल्ले करून आपली ताकद दाखवून दिली. तर इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे नवीन युद्ध प्रमुख मेजर जनरल अली शादमानी यांचा मृत्यू झाल्याने इराणला मोठा धक्का बसला आहे. शादमानी यांनी चार दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला होता.
इराणचे युद्ध प्रमुख मेजर जनरल गुलाम अली राशीद यांच्या मृत्यूनंतर या पदावर शादमानी यांची नेमणूक झाली होती.गेल्या शुक्रवारी राशीद यांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात २२४ इराणी नागरिकांचा मृत्यू झाला असून १,४८१ जण जखमी झाले आहेत. तर इस्रायलमध्ये २४ जणांचा मृत्यू झाला असून ६०० हून अधिक जण जखमी झाले.
इराणच्या गुप्त लष्करी सेंटरवर बॉम्बफेक केल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण दलाने केला आहे. इराणी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी या कांड सेंटरचा वापर करत होते. आम्ही इराणचे मुख्य कमांड सेंटर नष्ट केले आहे. हल्ल्यानंतर इराणचे सैन्य अधिकारी पळून गेले. पण, इस्त्रायल इराणच्या एक-एक सैन्य अधिकाऱ्यांना ठार करण्यासाठी सज्ज आहे, असे इस्रायलने म्हटले आहे.
उत्तर प्रदेशचे नागरिक इराणमध्ये अडकले
इराण-इस्त्रायल युद्धात उत्तर प्रदेशचे हजार जण इराणमध्ये अडकले आहेत. हे लोक इराणमध्ये धार्मिक यात्रेसाठी गेले होते. विमाने रद्द झाल्याने आम्ही अडकून पडलो आहोत. पैसे संपल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
खामेनी यांची अवस्था सद्दाम हुसैनसारखी होईल इस्त्रायल
इस्त्रायलचे संरक्षणमंत्री इजराईल काटज म्हणाले की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची अवस्था सद्दाम हुसैनसारखी होईल. मी इराणी हुकूमशहांना इस्त्रायली नागरिकांवर क्षेपणास्त्र डागण्याविरोधात कडक शब्दात इशारा देतो. खामेनी यांना इराणमध्ये तेथील नागरिक फासावर लटकवतील, असा इशारा त्यांनी दिला.
तेहरानमधून भारतीय विद्यार्थ्यांची सुटका
तेहरानमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय दूतावासाने शहरातील भारतीय विद्यार्थ्यांना शहराबाहेर सुरक्षित ठिकाणांवर पाठवले आहे. तसेच जे भारतीय नागरिक प्रवास करण्यास सक्षम असतील त्यांनी तत्काळ तेहरान सोडावे, असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच काही भारतीयांना इराण-आर्मेनिया सीमेमार्गे बाहेर काढण्यात येत आहे. भारतीय दूतावास सातत्याने भारतीय नागरिकांच्या संपर्कात आहे. तसेच त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.
कॅनडाच्या कॅननास्कीस येथे सुरू असलेल्या 'जी-७' बैठकीत इस्त्रायल-इराण तणाव दिसून येत आहे. इस्त्रायलला आपल्या आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे. इराणकडे कधीही अण्वस्त्र असू नयेत, असे 'जी-७' देशांनी सांगितले.
इराणला आण्विक कार्यक्रम थांबवावा लागेल ट्रम्प
इराणला आपला आण्विक कार्यक्रम थांबवावा लागेल. इराणला अणू करारावर स्वाक्षऱ्या कराव्या लागतील. इराण अण्वस्त्र बाळगू शकत नाही, हे मी अनेकवेळा सांगितले आहे. सर्वांनी तेहरान रिकामे करावे, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. तसेच अमेरिकेच्या कोणत्याही तळावर इराणने हल्ले केल्यास त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच मला युद्धविराम नको तर इराण-इस्त्रायलमध्ये पूर्णविराम पाहिजे आहे. हा संघर्ष पूर्ण थांबायला पाहिजे. इराणने यापूर्वीच कराराचा स्वीकार करायला पाहिजे होता. इराणने कोणत्याही शांतता चर्चेसाठी संपर्क केलेला नाही. आता त्यांच्याकडे कोणतीही संधी उपलब्ध नाही, असे ते म्हणाले.
ट्रम्प यांची खामेनींना धमकी
'जी-७' बैठक अर्धवट सोडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत परतले आहेत. मंगळवारी रात्री ट्रम्प यांनी टूथवर ३ पोस्ट केल्या. यामध्ये त्यांनी लिहिले की, 'आता आमचे इराणच्या आकाशावर पूर्ण नियंत्रण आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी कुठे लपले आहेत हे आम्हाला माहिती आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचणे खूप सोपे आहे, पण आम्ही त्यांना मारणार नाही. निदान आत्ता तरी नाही'.