इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची उडी; इराणची ३ अणुकेंद्रे केली उद्ध्वस्त; रशिया, चीन, सौदी, पाकिस्तानकडून निषेध

अमेरिकेने इराणमधील फोर्डो, नतांज आणि इस्फहान येथील अणुकेंद्रावर रविवारी सकाळी ४.३० वाजता (भारतीय वेळेनुसार) हल्ला केला. या कारवाईनंतर इराण संतापला असून या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची घोषणा त्यांनी केली. यामुळे जागतिक पातळीवर संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची उडी; इराणची ३ अणुकेंद्रे केली उद्ध्वस्त; रशिया, चीन, सौदी, पाकिस्तानकडून निषेध
Published on

तेहरान : इराण-इस्रायल युद्धात अनेक दिवसांपासून केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या अमेरिकेने रविवारी उडी घेतली. अमेरिकेने इराणमधील फोर्डो, नतांज आणि इस्फहान येथील अणुकेंद्रावर रविवारी सकाळी ४.३० वाजता (भारतीय वेळेनुसार) हल्ला केला. या हल्ल्याचे पडसाद जगभरात उमटत असून रशिया, चीन, कतार, सौदी, पाकिस्तान आदी देशांनी अमेरिकेच्या या कारवाईचा निषेध केला आहे. या कारवाईनंतर इराण संतापला असून या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची घोषणा त्यांनी केली. यामुळे जागतिक पातळीवर संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

इराणवरील हल्ल्यानंतर १३ तासांनंतर अमेरिकेच्या ‘जॉइंट चीफ ऑफ स्टाफ जनरल’ डॅन केन यांनी माहिती देताना सांगितले की, इराणमधील मोहिमेचे नाव ‘ऑपरेशन मिडनाइट हॅमर’ होते. यात १२५ विमाने सामील होती. त्यात ७ ‘बी-२’ स्टेल्थ बॉम्बर्स विमानांनी इराणच्या अणुकेंद्रावर हल्ला केला. इराणमधील फोर्डो, नतांज आणि इस्फहान येथे १४०० किलो वजनाचे बंकर बॉम्ब टाकण्यात आले, तर इस्फहान अणुकेंद्रावर टॉमहॉक क्षेपणास्त्रे डागली गेली. या मोहिमेत इराणला पूर्ण चकवा देण्यात आला. काही विमाने प्रशांत महासागराद्वारे रवाना करण्यात आली. त्यामुळे इराणला वाटले हल्ला तिथून होणार आहे. मात्र, खरा हल्ला दुसऱ्या दिशेने करण्यात आला. ही मोहीम पूर्णपणे गुप्त ठेवली होती. त्याची माहिती ठरावीक लष्करी अधिकाऱ्यांना होती. इराणी सैन्य व नागरिकांचे या हल्ल्यापासून कोणतेही नुकसान झाले नाही, असे ते म्हणाले.

इराण प्रत्युत्तर देणार - अराघची

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की, अमेरिकेला केवळ ताकद व धमकीची भाषा समजते. त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याची पर्वा नाही. आम्ही अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणबरोबरच आपल्या देशातील नागरिकांचा विश्वासघात केला आहे. त्यांनी नेत्यानाहू यांचे ऐकून हल्ला केला. नेत्यानाहू हे आपल्या फायद्यासाठी दुसऱ्या देशावर हल्ले करत असतात. इराण पाश्चिमात्य देशांवर कधीच विश्वास ठेवत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

सोमवारी आपण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार आहोत. रशिया व इराण हे मित्र असून दोघांमध्ये सामरिक भागीदारी आहे. दोघेही एकदुसऱ्याचा सल्ला घेऊन निर्णय घेतात. इराणच्या अणुकरारावर स्वाक्षरी करणारा रशिया हा देश आहे, असे अराघची यांनी सांगितले.

अमेरिकेचा चेहरा उघड - इराण

इराणविरोधातील हल्ल्याला अमेरिका जबाबदार आहे, अशी जोरदार टीका इराणचे राष्ट्रपती मसूद पजशकियान यांनी केली. या हल्ल्याच्या मागे कायमच अमेरिका होता. आता इस्रायल कमकुवत पडल्यानंतर अमेरिकेचा खरा चेहरा उघड झाला.

प्रत्युत्तरादाखल इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला

अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स’ने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी इस्रायलवर ‘खैबर’ क्षेपणास्त्राद्वारे सर्वात मोठा हल्ला केला आहे आणि १४ महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले. इराणी क्षेपणास्त्रे हैफा आणि तेल अवीवमधील लष्करी आणि निवासी ठिकाणांवर पडली आहेत.

इराणमध्ये आतापर्यंत ६५७, तर इस्रायलमध्ये २४ मृत्यू

इस्त्रायल-इराण हल्ल्याचा रविवारी दहावा दिवस आहे. या हल्ल्यात आतापर्यंत इराणमध्ये ६५७ जण ठार, तर २ हजार जण जखमी झाले. इस्रायलमध्ये २४ जण ठार, तर ९०० जण जखमी झाले.

इराणने हल्ला केल्यास जोरदार प्रत्युत्तर देऊ

अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी इशारा दिला की, इराणने अमेरिकेवर हल्ला केल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. इराणमधील हल्ल्यात सहभागी झालेल्या अमेरिकन सैनिकांचे त्यांनी अभिनंदन केले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची इच्छा शांती प्रस्थापित करणे आहे. त्यांना अण्वस्त्र नकोत, तर शांतता हवी आहे. इराणलाही आता तोच मार्ग निवडावा लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.

अमेरिकेचा हल्ला ऐतिहासिक - हर्जोग

इस्रायलचे राष्ट्रपती आइजॅक हर्जोग म्हणाले की, अमेरिकेने इराणवर केलेले हल्ले ऐतिहासिक आहेत. ट्रम्प यांचे वक्तव्य अमेरिका व इस्रायलमधील साहसी संबंध दाखवतात. लढाई अजूनही संपलेली नाही. येणारे दिवस आणखी कठीण असू शकतात. इस्रायलच्या नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पश्चिम आशियात अस्थिरता वाढतेय - चीन

चीनच्या सरकारी मीडियाने सांगितले की, अमेरिकेच्या पश्चिम आशियातील हल्ल्यामुळे या भागात अस्थिरता वाढत आहे, असे चीनने म्हटले आहे. २००३ मध्ये इराकवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामुळे पश्चिम आशियात दीर्घकाळ संघर्ष चालला. त्यामुळे हा संघर्ष कमी करायला राजनैतिक पातळीवर चर्चा करणे गरजेचे आहे, असे चीनने सुचवले.

पाकिस्तानकडून अमेरिकन हल्ल्याचा निषेध

अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचा पाकिस्तानने निषेध केला. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने सांगितले की, या क्षेत्रात तणाव वाढल्याने आमची चिंता वाढली. हे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याच्या सर्व मापदंडाचे उल्लंघन करत आहे. इराणला संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरनुसार आपले संरक्षण करण्याचा अधिकार आहे, असे पाकिस्तानने म्हटले आहे.

आम्हाला इराणशी युद्ध नको - जे. डी. व्हान्स

आम्हाला इराणशी युद्ध नको आहे. इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे ऐकावे. आम्हाला इराणी नागरिकांशी चांगले संबंध हवे आहेत, अशी मल्लिनाथी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी रविवारी सायंकाळी केली.

होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यास मंजुरी?

इराणच्या संसदेने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. तथापि, या निर्णयाला अंतिम मान्यता इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून मिळणे आवश्यक आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी अडथळ्यांपैकी एक आहे. ती अरबी समुद्राला पर्शियन आखाताशी जोडते. हा प्रदेश इस्रायल-इराण तणावाचे एक प्रमुख कारण आहे, कारण जगातील २०% तेल या होर्मुझ सामुद्रधुनीतून जाते. इराणने हा मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे, ज्यामुळे तेल बाजार आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.

...तर इराणवर आणखी हल्ले करू - ट्रम्प

या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देशाला संबोधित करताना सांगितले की, इराणची अणुकेंद्रे पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहेत. फोर्डो या अणुकेंद्रावर बॉम्बचा मारा करण्यात आला. इराणने आता शांततेवर लक्ष केंद्रित करावे. त्याने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर आणखी हल्ले केली जातील, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली.

तणाव कमी करा - मोदी

मी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी बोललो. आम्ही सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. वाढलेल्या तणावाबद्दल मी तीव्र चिंता व्यक्त केली असून संवाद आणि मुत्सद्देगिरीला प्राधान्य देऊन तणाव कमी करण्याचे आवाहन केले. या प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि स्थिरता लवकरात लवकर प्रस्थापित करण्याच्या गरजेवर भर देण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in