

तेल अवीव/तेहरान : इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्लाह मोजतबा खामेनी यांनी पदभार स्वीकारल्यानंतरच्या त्यांच्या पहिल्याच वक्तव्यात अमेरिकेला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘मध्य पूर्वेतील अमेरिकेचे लष्करी तळ बंद करावे लागतील, अन्यथा त्या तळांवर हल्ले सुरूच राहतील. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीही बंद राहील’.
सर्वोच्च नेते झाल्यानंतर मोजतबा खामेनी यांचा हा पहिलाच सार्वजनिक संदेश आहे. इराणच्या सरकारी टीव्हीवर वाचण्यात आलेल्या या संदेशात खामेनी म्हणाले की, ‘सध्याच्या परिस्थितीत होर्मुझची सामुद्रधुनी उघडली जाणार नाही.
एका रिपोर्ट्सनुसार, अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांच्या पहिल्याच दिवशी मोजतबा खामेनी यांचा पाय फ्रॅक्चर झाला आणि किरकोळ दुखापत झाली. त्यांचे वडील, माजी सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांचा ज्या हल्ल्यात मृत्यू झाला त्याच हवाई हल्ल्यात नवे सर्वोच्च नेते जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
अद्यापही भारतीय जहाजे होर्मुझ स्ट्रेटजवळ अडकली
काही भारतीय जहाजे आजही या संवेदनशील मार्गावर अथवा त्याच्या आसपास अडकली आहेत. जेव्हा या भागात युद्ध सुरू झाले तेव्हा कमीत कमी २८ जहाजे होर्मुझ स्ट्रेट परिसरात काम करत होती. ८ भारतीय जहाजे जी लढाई सुरू होण्यापूर्वी होर्मुझ स्ट्रेटच्या पूर्वेकडे होते, ते सुरक्षित पाण्यात प्रवास करत आहेत.
‘परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवर काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांशी संबंधित काही सागरी घटना घडल्या आहेत. या जहाजांवर एकूण ७८ भारतीय खलाशी होते. त्यापैकी ७० जण सुरक्षित बाहेर पडले आहेत. गेल्या काही दिवसांत चार जण जखमी झाले आहेत, परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे. दुर्दैवाने तीन जणांचा मृत्यू झाला असून एक खलाशी अद्याप बेपत्ता आहे,’ असे त्यांनी सांगितले. पर्शियन आखातात भारतीय ध्वज असलेल्या जहाजांची संख्या २८ इतकीच कायम आहे. त्यापैकी २४ जहाजे, ज्यावर ६७७ भारतीय खलाशी आहेत व ती हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्चिमेस आहेत. तर चार जहाजांवर १०१ भारतीय खलाशी असून ती पूर्वेकडे आहेत, असे सिन्हा यांनी स्पष्ट केले.
भारतात गरजेच्या ९०% एलपीजी येतो होर्मुझ सामुद्रधुनीतून
भारत आपल्या गरजेच्या सुमारे ६०% एलपीजी आयात करतो, ज्यापैकी जवळपास ९०% पुरवठा स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून येतो, असे भारत सरकारने स्पष्ट केले. परराष्ट्र, जहाजबांधणी, पेट्रोलियम, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गुरुवारी देशातील कच्च्या तेलाच्या आणि वायूच्या तुटवड्याबाबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली, त्यात ही माहिती दिली. सरकारने सांगितले की, देशातील परिस्थिती आव्हानात्मक आहे, परंतु सरकार गॅस पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. देशात दररोज सुमारे ५० लाख एलपीजी सिलेंडरची डिलिव्हरी केली जाते. अलीकडेच, घबराटीमुळे सिलेंडर बुकिंगमध्ये अनेक पटींनी वाढ दिसून आली आहे.
पेट्रोल-डिझेल, एलपीजीची उपलब्धता समाधानकारक
पेट्रोलियम मंत्रालयाच्या जॉइंट सेक्रेटरी (मार्केटिंग आणि ऑइल रिफायनरी) सुजाता शर्मा म्हणाल्या, ‘देशात पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या उपलब्धतेबाबतची स्थिती समाधानकारक आहे. भारत दररोज सुमारे ५५ लाख बॅरल कच्च्या तेलाचा वापर करतो आणि जगातील चौथा सर्वात मोठा रिफायनर असल्यामुळे पेट्रोल-डिझेलसारख्या उत्पादनांच्या उपलब्धतेबाबत विश्वास कायम आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने ९ मार्च रोजी, अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत सर्व रिफायनरीजना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर घरगुती उत्पादनात वाढ झाली आहे आणि आता ते २५% वरून २८% इतके झाले आहे. देशभरात सुमारे १ लाख रिटेल आउटलेट म्हणजेच पेट्रोल पंप कार्यरत आहेत, त्यापैकी बहुतेक सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांचे आहेत. या आउटलेट्सवर कुठेही इंधनाची कमतरता किंवा ड्राय-आउटची स्थिती निर्माण झालेली नाही.
भारत सरकार प्रत्येक तिमाहीत राज्यांना केरोसिनचे वाटप करते. दर तीन महिन्यांनी सुमारे १ लाख किलोलीटर केरोसिन राज्यांना दिले जाते. गुरूवारी जारी केलेल्या नवीन आदेशानुसार राज्य सरकारांना अतिरिक्त ४८ हजार किलोलीटर केरोसिन आणखी जारी केले जाईल. तर शिपिंग मंत्रालयाचे अधिकारी राजेश कुमार सिन्हा यांनी सांगितले की, पर्शियन गल्फ क्षेत्रात भारतीय जहाजांची संख्या सध्या २८ आहे आणि ही संख्या पूर्वीसारखीच कायम आहे. या जहाजांवर एकूण ७७८ भारतीय खलाशी आहेत. या २८ जहाजांपैकी २४ होर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्चिम भागात आहेत, ज्यांच्यावर ६७७ भारतीय खलाशी आहेत. तर चार जहाजे होर्मुझच्या पूर्व भागात आहेत, ज्यांवर १०१ भारतीय खलाशी आहेत. सरकार या सर्व जहाजांवर आणि त्यावरील कर्मचाऱ्यांच्या (क्रू) सुरक्षिततेवर सतत लक्ष ठेवून आहे.
अलीकडेच परदेशी ध्वज असलेल्या काही जहाजांवर भारतीय खलाशांशी संबंधित सागरी अपघात झाले आहेत. या जहाजांवर एकूण ७८ भारतीय खलाशी होते. यापैकी ७० खलाशी सुरक्षित बाहेर आले आहेत, तर चार खलाशी जखमी झाले आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनांमध्ये तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला आहे, तर एक खलाशी अजूनही बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.
पुरवठा संकटामागची कारणे
होर्मुझ सामुद्रधुनी जवळजवळ बंद होणे, हे भारतासाठी सर्वात मोठे आव्हान आहे. हा सुमारे १६७ किमी लांबीचा जलमार्ग आहे, जो पर्शियन गल्फला अरबी समुद्राशी जोडतो. इराणमधील युद्धामुळे हा मार्ग आता सुरक्षित राहिलेला नाही. धोका लक्षात घेता, कोणताही तेल टँकर तिथून जात नाही. जगातील एकूण पेट्रोलियमपैकी २०% हिस्सा येथूनच जातो. सौदी अरेबिया, इराक आणि कुवेतसारखे देशही त्यांच्या निर्यातीसाठी यावर अवलंबून आहेत. भारत आपल्या गरजेच्या ५०% कच्चे तेल आणि ५४% एलएनजी याच मार्गाने आयात करतो. इराण स्वतः याच मार्गाने निर्यात करतो.
...तर होर्मुझ सामुद्रधुनी खुली करू - इराण
इराणने सर्व देशांसमोर एक अट ठेवली आहे. इस्रायली राजदूताला जर एखादा देश बाहेर काढत असेल तर त्याला स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून प्रवासाची परवानगी देण्यात येईल. इराणच्या ताज्या विधानावर भारताने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी भारतीय सूत्रांनी दावा केला होता की, भारतीय टँकर पुष्पक, परिमल हे स्ट्रेट होर्मुझमधून सुरक्षितपणे प्रवास करत आहेत. परंतु अमेरिका, युरोप आणि इस्रायली जहाजांना या महत्त्वाच्या जलमार्गावर निर्बंधांचा सामना करावा लागत आहे.
पर्शियन आखातात ३ भारतीय खलाशांचा मृत्यू, एक बेपत्ता
पर्शियन आखातात परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवर काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांशी संबंधित काही सागरी घटनांमध्ये तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला असून एक खलाशी अद्याप बेपत्ता आहे, अशी माहिती बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी गुरुवारी दिली. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सिन्हा यांनी सांगितले की, या जहाजांवर एकूण ७८ भारतीय खलाशी होते. त्यापैकी ७० जण सुरक्षित असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. तर अन्य चारजण जखमी झाले आहेत.
भारताला परवानगी दिल्याचे वृत्त इराणने फेटाळले
भारतीय जहाजांना स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून प्रवास करण्याची परवानगी दिल्याची बातमी इराणने फेटाळली आहे. भारताचा झेंडा असणाऱ्या तेल टँकरला स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही, असे वृत्त इराणी सूत्रांच्या माध्यमातून रॉयटर्सने प्रसिद्ध केले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि इराणी परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यातील संवादानंतर इराणने भारताच्या जहाजांना स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून प्रवासाची मुभा दिली असल्याचे सांगितले जात होते. परंतु आता इराणने हा दावा फेटाळून लावला आहे. आतापर्यंत केवळ ३ चिनी टँकरना स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.