
तेहरान : इस्रायलसोबतचा संघर्ष संपल्यानंतर इराणने आता आपला अण्वस्त्र कार्यक्रम अधिक जोमाने पुढे रेटण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी’सोबतचे (आयएईए) सहकार्य थांबवण्याचा निर्णय इराणने घेतला असून संबंधित विधेयक इराणी संसदेने मंजूर केले आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने इराणमधील तीन महत्त्वाच्या अण्वस्त्र केंद्रांवर बॉम्ब हल्ले केल्यानंतर इराणी संसदेने हे महत्त्वाचे विधेयक तत्काळ मंजूर केले आहे.
याआधी ‘आयएईए’ची पथके वेळोवेळी इराणमधील अण्वस्त्र केंद्रांवर जाऊन तेथील प्रकल्पांची पाहणी करायचे. त्यामुळे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमांची प्रगती कितपत झाली आहे याची कल्पना जगाला असायची. पण आता अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने ‘आयएईए’सोबतचे सहकार्य रोखण्याचा निर्णय इराणने घेतला आहे. त्यामुळे आता इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे जगाला असलेला धोका वाढला आहे.
इराणने अण्वस्त्र तयार करू नये, यासाठी इस्रायल आणि अमेरिका जंगजंग पछाडत आहे. त्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत इराणला रोखू इच्छितात. यासाठीच इस्रायल व अमेरिकेने इराणवर हल्ला चढवला होता. दरम्यान, इराणी संसदेने मंजूर केलेले विधेयक आता संरक्षण समितीकडे जाईल. भविष्यात ‘आयएईए’ला इराणमधील कोणत्याही अण्वस्त्र केंद्रात जाऊन पाहणी करायची असल्यास त्यांना इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची परवानगी लागेल. इराण आता त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला अधिक गती देईल, असे इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर कलीबाफ यांनी म्हटले आहे. दरम्यान इराणच्या या इशाऱ्याप्रमाणे त्यांनी अण्वस्त्र कार्यक्रम त्यांनी सुरूच ठेवल्यास संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
... तर पुन्हा हल्ला करू - ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी नेदरलँड्समधील हेग येथे झालेल्या ‘नाटो’ शिखर परिषदेत माध्यमांशी बोलताना सांगितले की, जर इराणने आपला अणु कार्यक्रम पुन्हा सुरू केला तर ते पुन्हा हल्ला करतील.
इराणचे फारसे नुकसान झाले नाही, अमेरिकन मीडियाचा दावा इराणच्या अणु प्रकल्पांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमुळे इराणचे फारसे नुकसान झाले नाही, असा दावा ‘सीएनएन’ आणि ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने केला आहे. हा दावा अमेरिकन गुप्तचर अहवालाच्या आधारे करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणचा अणु कार्यक्रम काही महिने मागे पडला आहे. तो पूर्णपणे नष्ट झालेला नाही.