
नवी दिल्ली : इस्रायलसोबत आठवडाभर सुरू असलेल्या युद्धादरम्यान इराणने आपली हवाई हद्द भारतासाठी खुली केली आहे. ‘ऑपरेशन सिंधू’अंतर्गत येत्या दोन दिवसांत ३ विशेष विमानांनी भारतातील एक हजार भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना घेऊन एक विमान शुक्रवारी रात्री, तर शनिवारी दुपारपर्यंत दोन विमाने येतील. या विमानांची व्यवस्था भारत सरकारने केली आहे. ही विमाने इराणच्या मशहद येथून उड्डाण भरून दिल्लीत पोहचतील.
इस्रायलच्या बिर्शेबा शहरावर इराणचा हल्ला
शुक्रवारी सकाळी इराणने इस्रायलच्या बिर्शेबा शहरातील मायक्रोसॉफ्ट कार्यालयाच्या बाजूला बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला. यामुळे या भागातील अनेक कारना आग लागली. तसेच अनेक घरांचे नुकसान झाले.
इराणने इस्रायलच्या हैफा शहरात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून एक अल्पवयीन गंभीर जखमी आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने सांगितले की, इराणकडून येणाऱ्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या हल्ल्याचा माग काढला जात आहे. हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे सायरन वाजत आहेत. नागरिकांना पुढील आदेश मिळेपर्यंत निवाऱ्यात राहण्यास सांगितले आहे.
इस्रायलची हवाई हद्द उघडल्यानंतर तेल अविववरून ब्रिटिश नागरिकांना नेण्यासाठी चार्टर विमानांची व्यवस्था ब्रिटिश सरकारने केली आहे. सध्या इस्रायलचा बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळ गेल्या आठवड्यापासून बंद आहे.
इराणच्या अणुकेंद्रावर इस्रायलचा हल्ला
इराणच्या खोनदाब भागातील अणुभट्टीवर इस्रायलने मोठा हल्ला केला. या हल्ल्यात या अणुभट्टीचे मोठे नुकसान झाले आहे, असे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने सांगितले. दरम्यान, इस्रायलने आरोप केला की, इराणने त्यांच्याविरोधात क्लस्टर बॉम्बचा वापर केला.
इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या जवळ
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, इराणकडे अण्वस्त्र बनवण्याची क्षमता आहे, तर व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी आदेश दिल्यास इराण काही आठवड्यांत अणुबॉम्ब बनवू शकतो. अण्वस्त्र बनवण्यासाठी लागणारी प्रत्येक वस्तू इराणकडे आहे. मात्र, इराणने अण्वस्त्र बनवल्यास ते जगासाठी धोका असेल.