इराणमधील निदर्शनात २ हजार जणांचा मृत्यू; इराणी अधिकाऱ्यांची कबुली

इराणमध्ये देशव्यापी निदर्शनांदरम्यान मृतांची संख्या मंगळवारी किमान २,००३ वर पोहोचली असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. दडपशाहीच्या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी संपर्क व्यवस्था तोडल्याने काही दिवसांनंतर प्रथमच इराणी नागरिकांनी परदेशात फोन कॉल करू शकले.
इराणमधील निदर्शनात २ हजार जणांचा मृत्यू; इराणी अधिकाऱ्यांची कबुली
Photo : X
Published on

दुबई : इराणमध्ये देशव्यापी निदर्शनांदरम्यान मृतांची संख्या मंगळवारी किमान २,००३ वर पोहोचली असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. दडपशाहीच्या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी संपर्क व्यवस्था तोडल्याने काही दिवसांनंतर प्रथमच इराणी नागरिकांनी परदेशात फोन कॉल करू शकले.

अमेरिकास्थित ह्युमन राइट्स अ‍ॅक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, ही मृतसंख्या गेल्या अनेक दशकांत इराणमध्ये झालेल्या कोणत्याही आंदोलन किंवा अस्थिरतेतील आकड्यांपेक्षा खूपच जास्त आहे आणि १९७९ च्या इस्लामिक क्रांतीच्या काळातील गोंधळाची आठवण करून देते.

दोन आठवड्यांहून थोड्या अधिक काळापूर्वी इराणच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेविरोधात संतापातून ही आंदोलने सुरू झाली. ती थेट धर्माधिष्ठित सत्तेविरोधात वळली, विशेषतः सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेनी यांना लक्ष्य करण्यात आले.

मंगळवारी ‘एपी’ने तेहरानमधील निदर्शनांचे मिळालेले छायाचित्रांमध्ये खामेनी यांच्या मृत्यूची मागणी करणारे ग्राफिटी आणि घोषणाबाजी दिसून आली, अशी मागणी केल्यास मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते.

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सोमवारी रात्री कतारपुरस्कृत उपग्रह वाहिनी अल जझीराला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की अमेरिकेचे दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्याशी संवाद सुरूच आहे. “हा संवाद आंदोलनांपूर्वी, आंदोलनांच्या काळात आणि नंतरही सुरू आहे,” असे अराघची म्हणाले. मात्र, “वॉशिंग्टनच्या प्रस्तावित कल्पना आणि आमच्या देशाविरुद्धच्या धमक्या असंगत आहेत,” असेही त्यांनी नमूद केले. ट्रम्प यांच्या ताज्या ऑनलाइन विधानांवर त्यांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली नाही.

मृतसंख्येत तीव्र वाढ

कार्यकर्त्या गटानुसार मृतांपैकी १,८५० जण निदर्शक होते, तर १३५ जण सरकारशी संलग्न होते. आणखी नऊ मुले ठार झाली असून, निदर्शनांत सहभागी नसलेल्या नऊ नागरिकांचाही मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे १६,७०० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

इराणमध्ये इंटरनेट बंद असल्याने परदेशातून आंदोलनांचे आकलन करणे अधिक अवघड झाले आहे. एपीला ही मृतसंख्या स्वतंत्रपणे पडताळता आलेली नाही. इराण सरकारने एकूण हानीचे आकडे जाहीर केलेले नाहीत.

ह्युमन राइट्स अ‍ॅक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सीच्या स्कायलर थॉम्पसन यांनी एपीला सांगितले की ही नवी मृतसंख्या धक्कादायक आहे, विशेषतः २०२२ मधील महसा अमिनी आंदोलनांच्या महिनोनमहिन्यांच्या काळातील मृतसंख्येच्या चौपट इतकी संख्या केवळ दोन आठवड्यांत गाठली आहे. “आम्ही हादरलो आहोत, पण ही संख्या तरीही सावध अंदाज आहे,” असे त्यांनी इशारा देत म्हटले.

गुरुवारी रात्री बाह्य जगाशी संपर्क तुटल्यानंतर इराणी नागरिकांच्या फोन कॉल्समधून परिस्थितीचे काही चित्र समोर आले. साक्षीदारांनी मध्य तेहरानमध्ये कडेकोट सुरक्षा, जळून खाक झालेल्या सरकारी इमारती, फोडलेले एटीएम आणि रस्त्यांवरील तुरळक वर्दळ यांचे वर्णन केले. पुढे काय होणार, अमेरिकेच्या हल्ल्याची शक्यता-याबाबतही लोकांमध्ये चिंता असल्याचे त्यांनी सांगितले.

मदत येत आहे - ट्रम्प

नव्या मृतसंख्येचा खुलासा झाल्यानंतर लगेचच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिले: “इराणी देशभक्तांनो, आंदोलन सुरू ठेवा- तुमच्या संस्थांचा ताबा घ्या!!!” पुढे त्यांनी म्हटले: “निदर्शकांची निरर्थक हत्या थांबत नाही तोपर्यंत मी इराणी अधिकाऱ्यांसोबतच्या सर्व बैठका रद्द केल्या आहेत. मदत येत आहे.” मात्र, ट्रम्प यांनी तपशील दिले नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in