

तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने होणाऱ्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी अमेरिकेचे शिष्टमंडळ सोमवारी इस्लामाबादला येथे दाखल होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतची घोषणा रविवारी केली. मात्र इराणने या चर्चेसाठी शिष्टमंडळ पाठविण्यास नकार दिला आहे.
जोपर्यंत इराणविरुद्धची नौदल नाकेबंदी कायम आहे, तोपर्यंत चर्चेसाठी पाकिस्तानात कोणतेही शिष्टमंडळ पाठवले जाणार नाही, असे इराणची सरकारी वृत्तसंस्था असलेल्या 'तस्निम'ने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, एक कडक इशारा देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, ही इराणसाठीची शेवटची संधी आहे. त्यांनी असा इशारा दिला की, जर दोन्ही पक्षांमध्ये कोणताही करार झाला नाही, तर इराणच्या पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केले जातील.
इराणसोबतच्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी अमेरिकेचे वाटाघाटीकार सोमवारी पाकिस्तानात पोहोचणार असल्याची घोषणा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
रविवारी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी या दौऱ्याची माहिती दिली असली, तरी यामध्ये कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी चर्चेच्या पहिल्या फेरीचे नेतृत्व केले होते.
इराणचे अणुविषयक अधिकार मर्यादित करण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोणताही अधिकार नाही. ट्रम्प असा दावा करतात की, इराण आपल्या अणुविषयक अधिकारांचा वापर करू शकत नाही; मात्र, कोणत्या आधारावर ते असे म्हणतात, हे स्पष्ट करण्यात ते अपयशी ठरतात. एखाद्या राष्ट्राला त्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवणारे ते कोण आहेत? इराणला युद्ध नको असून, आम्ही केवळ आत्मसंरक्षणासाठी पावले उचलत आहोत, असे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी रविवारी स्पष्ट केले. पेझेशकियान यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा युद्धविरामाची मुदत आता संपुष्टात येत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये सध्या कोंडी निर्माण झाली आहे. या दोन राष्ट्रांमधील वादाचे मुख्य मुद्दे हे इराणचा अणुकार्यक्रम आणि 'होर्मुझच्या सामुद्रधुनी'वरील नियंत्रण याभोवती फिरत आहेत.
ट्रम्प यांचा इराणला वीज प्रकल्प, पूल उडवण्याचा इशारा
इराणने शनिवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये गोळीबार करून शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. जर इराणने अमेरिकेने दिलेला प्रस्ताव स्वीकारला नाही, तर इराणमधील प्रत्येक वीज प्रकल्प आणि पूल उद्ध्वस्त केला जाईल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
होर्मुझमधून जाणारी जहाजे रोखणार - इराण
इराणने मात्र अमेरिकेचा बंदरांवरील वेढा जोपर्यंत कायम आहे, तोपर्यंत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणारी जहाजे रोखून धरण्याचा पवित्रा घेतला आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर घालिबाफ यांनी सांगितले की, आम्हाला या मार्गाचा वापर करता येत नसेल, तर इतरांनाही तो करू देणार नाही. अमेरिकेचा हा निर्णय अज्ञानातून घेतलेला असल्याचे सांगत घालिबाफ यांनी अमेरिकेवर टीका केली. इराणचे उपपरराष्ट्र मंत्री सईद खतीबजादेह यांनीही अमेरिकेच्या या भूमिकेमुळे संपूर्ण शस्त्रसंधी धोक्यात येत असल्याचे नमूद केले आहे.