शत्रू राष्ट्रे वगळता 'होर्मुझ' सर्वांसाठी खुली; ४८ तासांत सामुद्रधुनी खुली करण्याची ट्रम्प यांचा अल्टिमेटम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा देत येत्या ४८ तासांत ही सामुद्रधुनी खुली करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांच्या या धमकीनंतर, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी आता शत्रू देश (अमेरिका-इस्रायल) वगळता सर्वांसाठी खुली करण्याची घोषणा केली आहे.
शत्रू राष्ट्रे वगळता 'होर्मुझ' सर्वांसाठी खुली; ४८ तासांत सामुद्रधुनी खुली करण्याची ट्रम्प यांचा अल्टिमेटम
शत्रू राष्ट्रे वगळता 'होर्मुझ' सर्वांसाठी खुली; ४८ तासांत सामुद्रधुनी खुली करण्याची ट्रम्प यांचा अल्टिमेटम
Published on

तेल अवीव/तेहरान/वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा देत येत्या ४८ तासांत ही सामुद्रधुनी खुली करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांच्या या धमकीनंतर, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी आता शत्रू देश (अमेरिका-इस्रायल) वगळता सर्वांसाठी खुली करण्याची घोषणा केली आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना जाऊ देण्याबाबत आता इराणने नरमाईची भूमिका घेतली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेतील इराणचे प्रतिनिधी अली मौसवी यांनी सांगितले की, “शत्रूंशी (अमेरिका आणि इस्रायल) संबंधित जहाजे वगळता, हा जलमार्ग सर्व प्रकारच्या जहाजांसाठी खुला राहील. इराणच्या शत्रूंशी संबंधित नसलेली जहाजे तेहरानसोबत सुरक्षा आणि संरक्षणाच्या व्यवस्थेबाबत समन्वय साधून या सामुद्रधुनीतून जाऊ शकतात.”

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून इराणला इशारा दिला होता. “जर हा जलमार्ग पुढच्या ४८ तासांत कोणत्याही धोक्याशिवाय पूर्णपणे खुला झाला नाही, तर अमेरिका इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला करेल. त्याची सुरुवात सर्वात मोठ्या वीज प्रकल्पापासून होईल आणि आम्ही विविध ऊर्जा प्रकल्पांना उद्ध्वस्त करू,” असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याआधी इराणने अमेरिकेला असा इशारा दिला होता की, जर त्यांच्या वीज प्रकल्पांना लक्ष्य केले गेले, तर ते मध्यपूर्वेतील अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित असलेल्या सर्व ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला करतील.

अमेरिकेच्या धमकीनंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचे एफ-१५ लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनुसार, इराणच्या हवाई संरक्षण दलाने जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राने होर्मुझ सामुद्रधुनीजवळ शत्रूचे एफ-१५ लढाऊ विमान पाडले आहे. त्यामुळे आखाती प्रदेशात सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या दाव्याची कोणतीही स्वतंत्र पडताळणी झालेली नाही किंवा अमेरिका-इस्रायलने कोणत्याही एफ-१५ विमानाचे नुकसान झाल्याची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही.

दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पझेशकियान यांनी शनिवारी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली. “ब्रिक्सने इराणवर होणारे हल्ले रोखण्यात भूमिका बजावली पाहिजे. ब्रिक्सने कोणत्याही दबावाशिवाय, स्वतःच्या बळावर काम केले पाहिजे आणि या प्रकरणात पुढे आले पाहिजे. मध्य पूर्वेतील देशांनी एकत्र येऊन एक नवीन सुरक्षा प्रणाली तयार केली पाहिजे. यामुळे या प्रदेशात शांतता आणि स्थिरता टिकून राहील आणि बाहेरील देशांचा हस्तक्षेप कमी होईल,” असे पझेशकियान यांनी मोदींशी चर्चेदरम्यान म्हटले आहे.

इराणने इस्रायलवर ४ क्षेपणास्त्रे डागली, ३०० जण जखमी

इराणने रविवार सकाळपासून इस्रायलवर चार बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. इराणने दिमोना आणि अराद या इस्रायलच्या शहरांवर हल्ले केले असून त्यात ३०० पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या एका इशाऱ्यानंतर इराणचे हे हल्ले अधिकच तीव्र झाले आहेत. इराणने केलेल्या हल्ल्यात इस्रायलचा प्रमुख अणुऊर्जा प्रकल्प याच भागात स्थित आहे. इस्रायलचे परराष्ट्र मंत्रालय आणि आरोग्य सेवा विभागाच्या माहितीनुसार, जखमींमध्ये मुलांचाही समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in