भीषण बॉम्बस्फोटांनी इराण हादरले; 103 लोकांचा मृत्यू, 170 हून अधिक जखमी

पोलिसांकडून हा आत्मघातकी हल्ला असल्याचे सांगितले जात असून याबाबत अधिक तपास सुरु आहे.
संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

इराणच्या केरमन शहरात बुधवारी (3 जानेवारी) दोन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या स्फोटात तब्बल 103 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 170 हून अधिक लोक यात जखमी झाले आहेत. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या कुड्स फोर्सचा प्रमुख इराणचा माजी लष्कर जनरल कासिम सुलेमान याच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याच्या समाधीस्थळावर मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. त्यावेळी हा स्फोट झाला. पोलिसांकडून हा आत्मघातकी हल्ला असल्याचे सांगितले जात असून याबाबत अधिक तपास सुरु आहे.

या स्फोटामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटना घडल्यानंतर याठिकाणी तात्काळ रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. तसेच, स्फोट होताच लोकांनी जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरु केल्याने चेंगराचेंगरी होऊन अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

कोण आहे कासिम सुलेमानी ?

इराणमध्ये कासिम सुलेमानीला हिरो समजले जाते. इराणच्या सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींच्या यादीत देखील त्याचे नाव होते. सुलेमानी हा इस्लामिक रिव्होल्युशरी गार्ड कॉर्प्सची विदेशी ऑपरेशन शाखा असलेल्या कुड्स फोर्सचा प्रमुख होता. त्याने 3 जानेवारी 2020 रोजी सीरियाला भेट दिली. तेथून तो इराकची राजधानी बगदादला पोहोचला. पण त्याच्या या भेटीची माहिती अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएला मिळाली.

यानंतर त्याचे सहकारी त्याला विमानाजवळ घ्यायला पोहचले. एका गाडीत जनरल कासिम आणि दुसऱ्या गाडीत शिया लष्कर प्रमुख मुहांदिस होते. यावेळी सुलेमानची कार विमानतळाच्या बाहेर पडताच रात्रीच्या अंधारात अमेरिकेने त्याच्या कारवर क्षेपणास्त्र डागले. यात सुलेमानीचा मृत्यू झाला होता.

logo
marathi.freepressjournal.in