तेहरान/तेल अवीव : मध्यपूर्वेतील युद्ध तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असताना आखातामधील अरब देशांमध्ये रविवारी इराणने नव्याने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. इराणने आपली लष्करी मोहीम आणखी तीव्र करण्याची धमकी दिली असून संयुक्त अरब अमिरातीतील तीन प्रमुख बंदरांमधून लोकांनी स्थलांतर करावे, असे आवाहन केल्याने आखातातील तणाव आणखी वाढला आहे.
या युद्धामुळे जागतिक हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून या प्रदेशातील तेल निर्यातही विस्कळीत झाली आहे. परिणामी इंधनाच्या किमतीत वाढ झाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तेल व वायू निर्यातीवर अवलंबून असलेल्या देशांनी होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षित ठेवण्यासाठी युद्धनौका पाठवाव्यात, असे आवाहन केले आहे. मात्र, अद्याप कोणत्याही देशाने ठोस आश्वासन दिले नसून काही देशांनी या प्रस्तावाचा विचार सुरू असल्याचे सांगितले.
दरम्यान, इस्रायलने रविवारीही इराणवर हवाई हल्ले सुरू ठेवले. बहारिन, सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरातीने त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे येणारी क्षेपणास्त्रे व ड्रोन रोखले. इराणने आरोप केला की, शुक्रवारी खार्ग बेटावर झालेले हल्ले अमेरिकेने संयुक्त अरब अमिरातीमधून केले. मात्र, अमेरिकन लष्करी तळ असलेल्या आखाती देशांनी, विशेषतः संयुक्त अरब अमिरातीने त्यांच्या भूभागाचा किंवा हवाई क्षेत्राचा वापर इराणविरोधी कारवायांसाठी झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च नेते मोजतबा पूर्णपणे ठीक
देशाचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी पूर्णपणे ठीक आहेत आणि त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. यापूर्वी, ‘द सन’ने वृत्त दिले होते की, मोजतबा २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात जखमी झाले होते. तेव्हापासून ते कोमात आहेत आणि त्यांचा एक पाय कापावा लागला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोजतबा जखमी झाल्याचे म्हटले आहे. तथापि, इराणचे परराष्ट्रमंत्री अराघची यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत.
नेतान्याहूंना ठार करण्याची इराणची धमकी
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा रविवारी सोळावा दिवस असून इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने असे म्हटले आहे की, जर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू अजूनही जिवंत असतील, तर ते त्यांचा शोध घेऊन त्यांना ठार करतील. जर 'बालकांचा मारेकरी' अजूनही जिवंत असेल, तर आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्याचा पाठलाग करू आणि त्याला ठार करू, असे इराणने म्हटले आहे.
नेतान्याहूंच्या मृत्यूच्या अफवेने खळबळ
नेतान्याहू हे इराणच्या हल्ल्यात मारले गेले आहेत किंवा ते पळून जर्मनीला गेले आहेत, अशा स्वरूपाचे दावे सोशल मीडियात पसरू लागले होते. त्यावर इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने एक निवेदन जारी करून स्पष्ट केले की, पंतप्रधान पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि अशा प्रकारची वृत्ते ही केवळ 'बनावट बातम्या' आहेत.