

तेहरान :अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण असे युद्ध पेटले असतानाच इराणच्या अध्यक्षांनी आता एक महत्त्वाचा निर्णय घोषित केला आहे. गेल्या आठ दिवसांपासून इराणकडून पश्चिम आशियातील आखाती देशांमध्ये क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ल्यांचे सत्र सुरू होते. इराणने शनिवारी शेजारी असलेल्या मुस्लिम देशांची माफी मागत क्षेपणास्त्र हल्ले थांबविण्याची घोषणा केली. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी दूरचित्रवाणीवर केलेल्या भाषणामध्ये स्पष्ट केले की, इराणच्या तात्पुरत्या नेतृत्व परिषदेने शेजारील देशांवरील हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ले थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
जोपर्यंत इतर देशांमधून हल्ले होणार नाहीत तोपर्यंत इराण हल्ले करणार नाही. इराणने ही भूमिका मांडल्याने आता युद्धातून मार्ग निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या भाषणात पेझेश्कियान म्हणाले की, मी शेजारच्या देशांची माफी मागतो, अन्य देशांवर आक्रमण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता, मात्र अमेरिका आणि इस्त्रायलसमोर आम्ही शरणागती पत्करणार नाही. इराणने शरणागती पत्करावी अशी शत्रूची इच्छा आहे, मात्र त्यांची इच्छा त्यांच्याबरोबरच त्यांच्याच थडग्यात गाडली जाईल, असेही पेझेश्कियान यांनी स्पष्ट करीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पलटवार केला.
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले असतानाच आता अमेरिकेकडून मोठी धमकी देण्यात आली आहे. अमेरिकेच्या सैन्याने इराणवरील कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून मध्यरात्री इराणविरुद्ध सर्वात मोठी बॉम्बहल्ला मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची धमकी अमेरिकेचे सचिव स्कॉट बेसेंट यांनी दिली आहे.