इराणचे सीरिया, इराकवर क्षेपणास्त्र हल्ले; इसिसचे तळ, मोसादचे कार्यालय लक्ष्य

सीरियातील इडलिब शहरातील आयसिसच्या तळांवर इराणने चार खैबर क्षेपणास्त्रे डागली.
इराणचे सीरिया, इराकवर क्षेपणास्त्र हल्ले;  इसिसचे तळ, मोसादचे कार्यालय लक्ष्य

तेहरान : इराणने मंगळवारी इराक आणि सीरियावर क्षेपणास्त्र हल्ले केले. इस्रायलच्या मोसाद या हेरगिरी संस्थेचे इराकच्या स्वायत्त कुर्द प्रांताची राजधानी अर्बिल शहरातील मुख्यालय आणि इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेचे सीरियातील तळ इराणने लक्ष्य बनवले. गेल्या काही दिवसांत इस्रायल आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांनी इराणसमर्थित संघटनांच्या नेत्यांना ठार मारल्याचा बदला म्हणून हे हल्ले केल्याचे इराणतर्फे सांगण्यात आले. अमेरिकेसह अनेक देशांनी त्यांचा निषेध केला आहे.

इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड काऊन्सिल (आयआरजीसी) या पथकांनी मंगळवारी इराक आणि सीरियातील लक्ष्यांवर ११ क्षेपणास्त्रे डागली. इराकच्या कुर्दबहुल प्रांताने स्वायत्तता जाहीर करून अर्बिल शहरात राजधानी स्थापन केली आहे. तेथे इस्रायलच्या मोसाद या गुप्तहेर संघटनेचे कार्यालय आहे. या कार्यालयातून इराणविरोधी गुप्त माहिती संकलित केली जात होती. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मोसादच्या अर्बिलमधील मुख्यालयावर हल्ला केल्याचे इराणने म्हटले आहे. अर्बिलमध्ये किमान आठ स्फोट झाले. या हल्ल्यात ४ नागरिक मारले गेले आणि सहा जण जखमी झाले. मृतांमध्ये पेश्रॉ दिझायी नावाचा श्रीमंत कुर्द उद्योगपती आणि त्याच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. इराणने डागलेले एक क्षेपणास्त्र त्यांच्या घरावर कोसळले. अर्बिल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या अमेरिका आणि बहुराष्ट्रीय सैन्याच्या तळाच्या दिशेने आलेले तीन बॉम्बवाहक ड्रोन्स हवेतच पाडल्याचे कुर्द स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. इराकच्या स्वायत्त कुर्द प्रांताचे पंतप्रधान मसरूर बर्झानी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून हा कुर्द नागरिकांविरुद्धचा गुन्हा असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी इराणने केलेल्या हल्ल्यांचा निषेध केला. इराणने केलेले हल्ले बेदरकार आणि इराकच्या स्थैर्याला धक्का देणारे असल्याचे मिलर यांनी म्हटले.

इसिसच्या हल्ल्यांचा बदला

सीरियातील इडलिब शहरातील आयसिसच्या तळांवर इराणने चार खैबर क्षेपणास्त्रे डागली. इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड्स दलांचे जनरल कासीम सुलेमानी यांना अमेरिकेने २०२० साली इराकमध्ये ड्रोन हल्ला करून ठार मारले होते. सुलेमानी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ३ जानेवारी रोजी इराणच्या केरमान शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात इसिसने दोन स्फोट घडवले होते. त्यात साधारण १०० नागरिकांचा मृत्यू झाला होता. इसिसने केलेल्या या हल्ल्याचा बदला म्हणून मंगळवारी सीरियात क्षेपणास्त्र हल्ले केल्याचे इराणने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायलने लेबॅननच्या बैरुत शहरात केलेल्या हल्ल्यात इराणसमर्थित हिजबुल्ला संघटनेचा वरिष्ठ नेता मारला गेला होता.

logo
marathi.freepressjournal.in