
तेहरान : पश्चिम आशियातील अमेरिकन सैन्य तळांपर्यंत इराण पोहचू शकतो, तसेच तो गरज पडल्यास आम्ही त्यांच्यावर पुन्हा कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी गुरुवारी अमेरिकेला दिला. अमेरिकेच्या कतार येथील तळावर केलेला हल्ला ही अमेरिकेला चपराक आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
इराण-इस्रायल युद्धविरामानंतर कतार येथील अमेरिकन तळांवर केलेल्या हल्ल्याबाबत पहिल्यांदाच ते म्हणाले की, शत्रू जर आक्रमण करत असेल तर त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागेल.
आम्ही कतारच्या अल-उदीद हवाई तळावर हल्ला करून त्याचे नुकसान केले. ही इराणने अमेरिकेला दिलेली जोरदार चपराक आहे. हा तळ अमेरिकेचा या भागातील महत्त्वाचा तळ आहे.
अमेरिकेने २२ जून रोजी ‘ऑपरेशन मिडनाइट हॅमर’अंतर्गत इराणची तीन अणुकेंद्रे फोर्डो, नतांज आणि इस्फहानवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. या मोहिमेत १२५ विमाने, ७ बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स, ३० टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा वापर केला. या हल्ल्यात इराणच्या सर्व अणुकेंद्राचे मोठे नुकसान केले, असे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले.
अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारच्या अमेरिकन तळावर हल्ला केला. इराणने कतारच्या ‘अल-उदीद’ हवाई तळावर ६ क्षेपणास्त्रे डागली. त्यामुळे पश्चिम आशियात मोठ्या प्रमाणावर तणाव वाढला. पण, कतारच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, कतारच्या हवाई दलाने इराणची अनेक क्षेपणास्त्रे निकामी केली.
युद्धात इस्रायल नष्ट होण्याची अमेरिकेला भीती वाटली
इस्रायल पूर्ण नष्ट होईल, या भीतीने अमेरिकन सरकारने या युद्धात थेट प्रवेश केला. अमेरिका इस्रायलला वाचवण्यासाठीच युद्धात पडला. मात्र, त्यांना काहीच फायदा झाला नाही, असे ते म्हणाले.