इसिसने घडवला पाकमधील स्फोट

पोलिसांचा प्राथमिक अंदाज : मृतांचा आकडा ४६ वर
इसिसने घडवला पाकमधील स्फोट

इस्लामबाद : पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनख्वा प्रांतात रविवारी झालेल्या स्फोटाला इस्लामिक स्टेट (इसिस) ही दहशतवादी संघटना जबाबदार असल्याची प्राथमिक माहिती पाकिस्तानी पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, स्फोटातील मृतांचा आकडा सोमवारी ४६ वर पोहोचला आहे. अद्याप काही जखमींची प्रकृती गंभीर आहे.

खैबर-पख्तुनख्वा प्रांतातील बजौर जिल्ह्यातील खार येथे रविवारी जमियत उलेमा इस्लाम-फझ्ल (जेयूआय-एफ) या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची सभा भरली होती. त्यात आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. रविवारी त्यात किमान ३९ जण ठार, तर २०० जण जखमी झाल्याचे वृत्त आले होते. सोमवारी मृतांच्या आकड्यात वाढ होऊन तो ४६ वर पोहोचला आहे.

रविवारी या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नव्हती. मात्र, स्फोट झालेला प्रदेश अफगाणिस्तानच्या सीमेला लागून आहे. तेथे इसिस आणि तेहरिक-ए-तालिबान-पाकिस्तान(टीटीपी) या दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात होता. त्यापैकी इसिसनेच स्फोट घडवून आणला असल्याची प्राथमिक माहिती सोमवारी पाकिस्तानी पोलिसांनी जाहीर केली. या प्रकरणी अज्ञात दहशतवाद्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in