दक्षिण लेबनॉन तात्काळ रिकामे करा, इस्रायलची नागरिकांना 'वॉर्निंग'; बैरूतवरील हल्ल्यात ९ जणांचा मृत्यू

आम्हाला सामान्य नागरिकांचे नुकसान करायचे नाही. त्यामुळे, नागरिकांनी सुरक्षेसाठी तत्काळ घरे रिकामी करावीत. जो कोणी हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना मदत करत आहे, तो...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रछायाचित्र : (एक्स)
Published on

लेबनॉनची राजधानी बैरूत येथे इस्रायली सैन्याने जोरदार हवाई हल्ले केले. यात ९ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. अजून जोरदार हल्ले करण्याच्या तयारीत इस्त्रायल आहे. त्यामुळे दक्षिण लेबनॉन तातडीने रिकामे करण्याचे आवाहन लेबनिज नागरिकांना इस्रायलच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) केले आहे.

इस्रायल संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल अविचार्य अद्राई म्हणाले की, हिजबुल्लाच्या कारवायांमुळे ‘आयडीएफ’ त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास मजबूर करत आहे. आम्हाला सामान्य नागरिकांचे नुकसान करायचे नाही. त्यामुळे, नागरिकांनी सुरक्षेसाठी तत्काळ घरे रिकामी करावीत. जो कोणी हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना मदत करत आहे, तो स्वत:ला अडचणीत आणत आहे, असा इशारा त्यांनी दिला.

नसरल्लाहच्या जावयाचा हल्ल्यात मृत्यू

हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्लाह याचा जावई हसन जाफर अल-कासिर याला ठार मारल्याचा दावाही इस्रायलने केला आहे. इस्रायली लष्कराने बुधवारी सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये हवाई हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असून, आणखी दोन दहशतवादीही यामध्ये मारले गेले आहेत.

‘हमास’चा मोठा नेता रवाही मुस्तहा ठार

इस्रायली लष्कराने दावा केला की, गाझापट्टीत तीन महिन्यांपूर्वी केलेल्या हल्ल्यात हमासचा मोठा नेता रवाही मुस्तहा ठार झाला आहे. तसेच आणखी दोन नेते मृत्युमुखी पडले. गेल्या काही दिवसांच्या कारवाईत हिजबुल्लाचे ६० जण मारले गेले आहेत. इस्रायली सैन्याने २०० हून अधिक ठिकाणांवर आतापर्यंत हल्ले केले आहेत.

दक्षिण बैरूत येथे इस्रायलने तीन हवाई केले. लेबनॉनच्या आरोग्य खात्याने सांगितले की, मध्य बैरूत येथे झालेल्या इस्रायलच्या हल्ल्यात ९ नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाईल, तर लेबनॉनमधील रेडक्रॉसच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या हल्ल्यात त्यांचे डॉक्टर जखमी झाले आहेत, तर लेबनॉनचा एक सैनिक मारला गेला.

logo
marathi.freepressjournal.in