इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त

ब्लू लाईनवर संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेत भारताचे ६०० सैनिक आहेत. आम्ही ब्ल्यू लाईनबाबत (लेबनॉन-इस्रायल सीमा) चिंतित आहोत, असे भारतीय परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रछायाचित्र सौजन्य - एक्स (@AdameMedia)
Published on

बैरूत : इस्रायलने लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला केल्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेच्या सुरक्षेबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे. आम्ही ब्ल्यू लाईनबाबत (लेबनॉन-इस्रायल सीमा) चिंतित आहोत, असे भारतीय परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.

या ब्लू लाईनवर संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेत भारताचे ६०० सैनिक आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या परिसराच्या अखंडतेची सन्मान केला पाहिजे, असे भारताने सांगितले.

इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर केलेल्या हल्ल्यात संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेतील दोन जवान जखमी झाले.

आमच्या तळावर अनेक हल्ले झाले - संयुक्त राष्ट्र

आमच्या तळावर इस्रायलने गेल्या २४ तासांत अनेक हल्ले केले. इस्रायली सैनिकांनी जाणूनबुजून संयुक्त राष्ट्रांच्या कॅमेरा व लाइटट्सवर गोळ्या चालवल्या, असा आरोप संयुक्त राष्ट्रांनी केला. संयुक्त राष्ट्रांच्या तळावर हल्ला केल्याप्रकरणी इटली, फ्रान्स व इंडोनेशिया आदी देशांनी इस्त्रायलकडून उत्तर मागितले आहे. सध्या लेबनॉनमध्ये ४८ देशांचे १०,५०० शांती सैनिक आहेत. त्यात भारताच्या ६०० सैनिकांचा समावेश आहे.

इराणच्या तेल विहिरींवर हल्ला नको, सौदी- कतारचा अमेरिकेवर दबाव

इराणच्या तेल विहिरींवर हल्ला करू नये, यासाठी सौदी अरेबिया व कतार अमेरिकेवर दबाव टाकत आहेत. इराणवर हल्ला करण्यासाठी आम्ही इस्त्रायलला आपली हवाई हद्द वापरायला देणार नाही, असे सौदी-कतारने जाहीर केले आहे.

२२ ठार, १७७ जण जखमी

दरम्यान, इस्त्रायलने बैरूत येथील इमारतीवरही हल्ले केले. यात २२ जणांचा मृत्यू झाला असून, १७७ जण जखमी झाले, असे लेबनॉनच्या आरोग्य खात्याने सांगितले. या हल्ल्यात हिजबुल्लाचा समन्वयक विभागाचा प्रमुख वाफीक साका याला टार्गेट करण्यात आले, मात्र तो पळण्यात यशस्वी ठरला आहे.

logo
marathi.freepressjournal.in