
तेल अवीव : गेल्या १५ महिन्यांपासून संघर्ष करणाऱ्या इस्रायल व ‘हमास’मध्ये अखेर शस्त्रसंधी झाली आहे. या निर्णयाचे जगभरातील विविध देशांनी स्वागत केले आहे. या निर्णयाबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यानाहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन व नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.
कतारच्या पंतप्रधानांनी बुधवारी इस्रायल-हमास हे शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचे जाहीर केले. ही शस्त्रसंधी येत्या रविवारपासून लागू होणार आहे. अपहृत व कैद्यांची दोन्ही देश अदलाबदल करणार आहेत. या करारामुळे इस्रायल-गाझात सुरू असलेला १५ महिन्यांचा संघर्ष थांबेल.
पॅलेस्टिनींनी रस्त्यावर उतरून साजरा केला आनंद
इस्रायल-हमास कराराची घोषणा होताच पॅलेस्टिनी नागरिकांनी रस्त्यावर उतरून आनंद साजरा केला. दरम्यान, भारताने या कराराबाबत आनंद व्यक्त केला आहे. यामुळे गाझाच्या लोकांना मानवी मदत मिळेल व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाऊ शकेल. भारताने सातत्याने सर्व अपहृतांची सुटका, शस्त्रसंधी व राजनैतिक मार्गाने प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले होते, असे भारतीय परराष्ट्र खात्याने सांगितले.
७ ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्रायलवर ‘हमास’ने हल्ला केला होता. त्यात १२०० हून अधिक जण मारले गेले. यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात ४६ हजारहून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले. गाझाची ९० टक्के लोकसंख्या विस्थापित झाली.
शस्त्रसंधीनंतर इस्रायलच्या हल्ल्यात ७२ जणांचा बळी
शस्त्रसंधीनंतर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ७२ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती गाझाच्या आरोग्य खात्याने दिली.