इस्रायल-हमास यांच्यात शांतता करारावर स्वाक्षऱ्या

गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षातून मार्ग काढण्यात यश आले असून दोन्ही पक्षांनी याबाबतच्या शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या. गाझामधील युद्ध थांबवून काही ओलीस व कैद्यांची अदलाबदल करण्यास दोघांनीही सहमती दर्शवली आहे.
इस्रायल-हमास यांच्यात शांतता करारावर स्वाक्षऱ्या
Published on

वॉशिंग्टन : गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षातून मार्ग काढण्यात यश आले असून दोन्ही पक्षांनी याबाबतच्या शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या. गाझामधील युद्ध थांबवून काही ओलीस व कैद्यांची अदलाबदल करण्यास दोघांनीही सहमती दर्शवली आहे. ट्रम्प प्रशासनाने घडवलेल्या या करारामुळे गाझापट्टीत पुन्हा शांतता प्रस्थापित होण्याची आशा निर्माण झाली आहे.

याचा अर्थ सर्व अपहृत व कैदी लवकरच मुक्त केले जातील आणि इस्रायल आपले सैन्य मागे घेईल. ही मजबूत, टिकाऊ आणि शाश्वत शांततेच्या दिशेने पहिली पायरी असेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे की, देवाच्या कृपेने आम्ही सर्वांना घरी आणू. हमासने सांगितले की, त्यांनी अशा कराराला संमती दिली आहे, ज्यामुळे गाझामधील युद्ध संपेल, इस्रायली सैन्य माघारी जाईल, गाझामध्ये मदत पोहोचेल आणि कैद्यांच्या बदल्यात बंदिवानांची सुटका होईल.

हमासने ट्रम्प आणि मध्यस्थांना आवाहन केले की, इस्रायलने करारातील सर्व अटी ‘कुठलीही टाळाटाळ न करता’ अंमलात आणाव्यात. या आठवड्याच्या शेवटी हमास २० जिवंत अपह्रतांची मुक्तता करणार आहे, तर इस्रायली सैन्य गाझाच्या बहुतांश भागातून माघारी जाण्यास सुरुवात करेल.

मोदींनी साधला ट्रम्प यांच्याशी संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गाझा शांतता योजनेच्या यशाबद्दल फोनवरून अभिनंदन केले. मोदी यांनी ‘एक्स’ वर म्हटले, ‘माझे मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी संवाद साधला आणि ऐतिहासिक गाझा शांतता योजनेच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.’ व्यापार वाटाघाटीत मिळालेल्या चांगल्या प्रगतीचा आढावादेखील आम्ही घेतला. येणाऱ्या आठवड्यांत सतत संपर्कात राहण्यावर त्यांनी सहमती दर्शवली,’ असे त्यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in