इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमास सरकारचा प्रमुख ठार; गाझापट्टीत ४०० हून अधिक जणांचा मृत्यू

इस्रायलच्या हवाई दलाने मंगळवारी गाझामध्ये भयंकर हवाई हल्ला केला. युद्धविराम केल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमास सरकारचा प्रमुख ठार; गाझापट्टीत ४०० हून अधिक जणांचा मृत्यू
Published on

देइर- अल-बलाह : इस्रायलच्या हवाई दलाने मंगळवारी गाझामध्ये भयंकर हवाई हल्ला केला. युद्धविराम केल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. गाझामधील आरोग्य मंत्रालयाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने सकाळी हवाई हल्ला केला. त्यामध्ये गाझामधील सुमारे ४०० हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर ३०० हून अधिक लोक जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

इस्त्रायलने गाझामध्ये केलेल्‍या हवाई हल्यात ‘हमास’ सरकारचे प्रमुख एस्साम अल-दालिस यांच्यासह अनेक वरिष्‍ठ नेते ठार झाल्‍याचा दावा पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना ‘हमास’ने केला असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. ओलिसांना सोडण्यास ‘हमास’ने सातत्याने नकार दिल्यानंतर दोन महिन्यांच्या युद्धबंदीनंतर पुन्हा एकदा हल्ला केल्याचे इस्रायलने स्पष्ट केले आहे.

दहशतवादी ठिकाणांवर हल्ले

पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना ‘हमास’ने म्हटले आहे की, इस्रायली सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात मारल्या गेलेल्या अधिकाऱ्यांच्या यादीत एसाम अल-दालिस यांचा समावेश आहे. तसेच या हल्ल्यांमध्ये गृह मंत्रालयाचे प्रमुख महमूद अबू वत्फा आणि अंतर्गत सुरक्षा सेवेचे महासंचालक बहजत अबू सुलतान यांचाही मृत्यू झाला आहे. युद्धबंदी वाटाघाटी फिस्कटल्यानंतर इस्रायलने मध्य गाझामध्ये पुन्‍हा एकदा हवाई हल्ला केला. यामध्ये ४०० हून अधिक लोक मारले गेले आहेत.

इस्रायली सैन्याने टेलिग्रामवरील एका पोस्टमध्ये म्‍हटले आहे की, ते सध्या गाझा पट्टीतील ‘हमास’ दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करत आहेत. अलीकडील हल्ल्यांपूर्वी, इस्रायलने गेल्या दोन आठवड्यांपासून सर्व अन्न, औषध, इंधन आणि इतर पुरवठा रोखला होता, ‘हमास’ने त्यांच्या युद्धबंदी करारात बदल स्वीकारण्याची मागणी केली होती.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी लष्कराला ‘हमास’विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. इस्रायल आता वाढत्या लष्करी ताकदीने ‘हमास’विरुद्ध कारवाई करेल, असे नेतान्याहू यांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, हल्ल्यांमध्ये ३००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक मुले जखमी झाली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in