तेल अवीव : लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाचा खात्मा करेपर्यंत इस्रायल तेथे युध्द मोहीम सुरूच ठेवेल, असे इस्रायलने जाहीर केले आहे. दरम्यान, न्यूयॉर्कमध्ये बुधवारी संयुक्त राष्ट्र महासभेत इस्रायल-लेबनॉन युद्ध रोखण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलावली होती. त्यात अमेरिका व फ्रान्सने २१ दिवसांच्या शस्त्रसंधीची मागणी केली. मात्र, इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केले की, ‘शस्त्रसंधी’ची बातमी खरी नाही. आम्ही लेबनॉनवर हल्ले सुरूच ठेवणार.
लेबनॉनमध्ये घुसण्याची पूर्ण तयारी इस्रायलने केली आहे. इस्रायलचे लष्करी प्रमुख हालेवी म्हणाले की, हिजबुल्लाचे तळ उद्ध्वस्त करणे हे आमच्या हवाई हल्ल्याचे उद्दिष्ट आहे. इस्रायलचे लष्कर हिजबुल्लाच्या ताब्यातील भागात घुसून त्यांना उद्ध्वस्त करेल. इस्रायली सैन्याचा सामना करणे म्हणजे काय? हे त्यांना तेव्हा कळेल. हिजबुल्लामुळे इस्रायलच्या लोकांना घर सोडावे लागले. आता ते घरी येऊ शकतील.इस्रायलने सांगितले की, पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या सल्ल्यानुसार, लष्कर पूर्ण ताकदीने लेबनॉनमध्ये युद्ध सुरू ठेवेल.
हिजबुल्लाने ४५ रॉकेट डागले
इस्रायलच्या राफेल लष्करी तळावर हिजबुल्लाने ४५ रॉकेट डागले आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज अद्याप हाती आलेला नाही.
भारतीयांना लेबनॉन सोडण्याची भारताची सूचना
लेबनॉनमधील युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक नवीन सूचना जारी केली आहे. बैरूतमधील भारतीय दूतावासाने येथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांना त्वरित देश सोडण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर लोकांना अत्यंत सावध राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी दूतावासाने लोकांना लेबनॉनमध्ये जाण्यास मनाई केली होती.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सौदी अरेबिया, यूएई, कतारसह युरोपातील काही देशांनी शस्त्रसंधीची मागणी केली. लेबनॉनमधील युद्ध रोखणे गरजेचे आहे अन्यथा मध्य पूर्वेतील युद्ध वाढू शकते. राजनैतिक मार्गाने ते रोखले जाऊ शकते, असे या देशांनी म्हटले आहे.