इस्रायलचा इराणवर पुन्हा हल्ला; इराणची १५ लढाऊ विमाने नष्ट; कतारच्या अमेरिकन तळावर इराणचा हल्ला

इस्रायलचा इराणवर पुन्हा हल्ला; इराणची १५ लढाऊ विमाने नष्ट; कतारच्या अमेरिकन तळावर इराणचा हल्ला

इराणच्या फोर्डो अणुकेंद्रावर अमेरिकेनंतर इस्रायलने सोमवारी हल्ला केला. तसेच इराणच्या सहा लष्करी विमानतळांवर इस्रायलने हल्ला करून १५ लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर उद्ध्वस्त केली आहेत. दरम्यान, सोमवारी रात्री इराणने कतारच्या अमेरिकन तळावर क्षेपणास्त्रांनी हल्ले केले.
Published on

तेहरान/तेल अवीव : इराणच्या फोर्डो अणुकेंद्रावर अमेरिकेनंतर इस्रायलने सोमवारी हल्ला केला. तसेच इराणच्या सहा लष्करी विमानतळांवर इस्रायलने हल्ला करून १५ लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर उद्ध्वस्त केली आहेत. दरम्यान, सोमवारी रात्री इराणने कतारच्या अमेरिकन तळावर क्षेपणास्त्रांनी हल्ले केले.

सोमवारी इस्रायली सैन्याने तेहरानमधील इराणी लष्करी युनिट इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये शेकडो सैनिक मारले गेल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायलने एविन तुरुंग, ‘आयआरजीसी’चे बसिज फोर्स मुख्यालय आणि अंतर्गत सुरक्षा मुख्यालयांना सोमवारी लक्ष्य केले.

इराण-इस्रायलदरम्यान गेल्या ११ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. इस्रायलने इराणच्या अनेक सरकारी व लष्करी आस्थापनांवर हल्ले केले. तसेच राजधानी तेहरानमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. खामेनी विरोधकांना ठेवण्यात आलेल्या इराणच्या इविन तुरुंगावर इस्रायलने हल्ला केला. या तुरुंगातील राजनैतिक कैद्यांना पळून जाण्यास मदत करणे हे आमचे लक्ष्य आहे, असे इस्रायलने सांगितले.

इराणच्या प्रसारमाध्यमांनी सांगितले की, इस्रायलच्या अशोदाद ऊर्जा प्रकल्पावर हल्ला करण्यात आला. मात्र, इस्रायली लष्कराने या हल्ल्याला दुजोरा दिला नाही.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक देशांनी तणाव कमी करण्याचे आवाहन दोन्ही देशांना केले आहे. तरीही दोन्ही देश मागे हटायला तयार नाहीत. उत्तर इस्रायलमध्ये इराणकडून अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली.

अमेरिकेला कधी, केव्हा उत्तर द्यायचे इराण ठरवेल - खतीबजादेह

इराणच्या अणुकेंद्रावर हल्ला केल्यानंतर अमेरिकेला उत्तर देण्याचा अधिकार आम्हाला आहे. अमेरिकेला कधी, कसे व केव्हा उत्तर द्यायचे याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असा इशारा इराणचे उपपरराष्ट्र मंत्री सईद खतीबजादेह यांनी दिला आहे.

सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला

सीरियाच्या हसाका प्रांतात अमेरिकन लष्करी तळावर हल्ला करण्यात आला आहे. तथापि, इराणने हा हल्ला केला की नाही हे स्पष्ट झालेले नाही. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, इराण त्यांच्या अणुतळांवरील हल्ल्यांचा बदला म्हणून मध्य-पूर्वेतील अमेरिकन तळांवर हल्ला करण्याची शक्यता आहे.

इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला

इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, इराणने इस्रायलवर सोमवारी क्षेपणास्त्र हल्ला केला. इराणने इस्रायलवर ‘फतेह-१’ हे क्षेपणास्त्र डागले. यामुळे इस्रायलमध्ये सायरन वाजत होते. सर्व नागरिकांना सुरक्षित बंकरमध्ये जाण्याचे आदेश दिले होते. जेरूसलेम शहरात मोठमोठे सायरन वाजत असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी सांगितले की, इराणला कोणती मदत पाहिजे याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. आम्ही इराणला मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे सांगितले. आमचे इराणला समर्थन आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेत इराणचा मुद्दा अनेक वेळा आला.

पुतिन यांची इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची सोमवारी भेट घेतली. "हे इराणवर विनाकारण केलेले आक्रमण आहे, त्याला कोणताही आधार किंवा समर्थन नाही," असे पुतिन यांनी सांगितले.

खामेनी यांनी पुतिन यांच्याकडे मागितली मदत

इस्रायलसोबतच्या युद्धादरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मदत मागितली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची मॉस्कोमध्ये पुतिन यांना भेटण्यासाठी गेले आहेत. अराघची हे खामेनी यांचे एक पत्र पुतिन यांना देणार आहेत, ज्यामध्ये पुतिन यांच्याकडे इराणने सर्वतोपरी पाठिंब्याची मागणी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in