ट्रम्प यांच्या आवाहनानंतरही इस्त्रायल - इराणकडून युद्धविरामाचे उल्लंघन; संघर्ष सुरूच राहण्याची चिन्हे
दुबई : गेल्या १२ दिवसांपासून इराण व इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू होते. या युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करून दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाल्याची घोषणा केली. मात्र, त्यानंतर काही तासांतच इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यामुळे प्रत्युत्तरादाखल इस्त्रायलनेही इराणवर हल्ला करून युद्धविरामाचे उल्लंघन केले. त्यामुळे ट्रम्प यांची मध्यस्थी अपयशी ठरल्याची चर्चा रंगली असून दोन्ही देशातील संघर्ष सुरूच राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
युद्धबंदी लागू झाल्यानंतर काही तासांतच इस्रायल आणि इराण दोघांनीही त्याचे उल्लंघन केले. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील एका रडार साइटवर हवाई हल्ला केला. इस्रायली आर्मी रेडिओने या हल्ल्याची पुष्टी केली आहे.
तत्पूर्वी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना फोन करून इराणवरील हल्ला थांबवण्याची विनंती केली. मात्र, नेतान्याहू यांनी ट्रम्प यांना सांगितले की, ‘मी हल्ला थांबवू शकत नाही, कारण इराणने प्रथम युद्धबंदीचे उल्लंघन केले आणि त्याला प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे.’
दोन्ही देशांमधील युद्धाच्या १२ व्या दिवशी, मंगळवारी पहाटे ३:३२ वाजता, ट्रम्प यांनी युद्धबंदीच्या कराराची घोषणा केली. सकाळी १०:३८ वाजता त्यांनी आणखी एक पोस्ट केली आणि लिहिले की, "आतापासून युद्धविराम लागू झाला आहे, कृपया तो मोडू नका."
मात्र, युद्धबंदी सुरू झाल्यानंतर अवघ्या अडीच तासांतच इराणने इस्रायलवर सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. बेअरशेबा शहरातील एका इमारतीवर ही क्षेपणास्त्रे आदळली, ज्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आणि २० हून अधिक जण जखमी झाले. इराणी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने आपल्या सैन्याला तेहरानवर हल्ला करण्याचे आदेश दिले. त्यानंतर इस्त्रायली सैन्याने तेहरानमधील एका रडारवर हल्ला केला.
इराणच्या सरकारी दूरदर्शनवर सकाळी ७:३० वाजता युद्धविराम लागू झाल्याची घोषणा झाली असली तरी इस्रायलने अद्याप ट्रम्प यांच्या प्रस्तावावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे इस्रायलला प्रतिहल्ल्यासाठी आणखी वेळ मिळाला. बेअरशेबा शहरात, मदतकार्य करणाऱ्यांनी एका इमारतीतून ४ मृतदेह बाहेर काढले. आजूबाजूच्या परिसरात काचा आणि इतर वस्तूंचे तुकडे विखुरलेले होते, अनेक इमारतींच्या खिडक्या फुटल्या होत्या आणि लोक बाहेर उभे राहून आपल्या घरांकडे पाहात होते.
इस्रायली लष्कराने जनतेला आश्वस्त करत म्हटले की त्यांनी सध्या बाँबशेल्टरमधून बाहेर पडण्यास हरकत नाही, पण सावधगिरी म्हणून जवळपासच थांबावे.
“१२ दिवसांचे युद्ध” असा ट्रम्प यांच्याकडून उल्लेख
ट्रम्प यांनी या संघर्षाला "१२ दिवसांचे युद्ध" असे नाव दिले. ही उपमा १९६७ मधील 'सहा दिवसांच्या युद्धा'प्रमाणे आहे, जेव्हा इस्रायलने इजिप्त, जॉर्डन, सीरिया आदी अरब देशांशी युद्ध केले होते. या संदर्भामुळे अरब जगतात आणि विशेषतः पॅलेस्टिनी लोकांमध्ये भावनिक प्रतिक्रिया निर्माण झाली आहे.
मात्र, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की कोणताही अधिकृत युद्धविराम ठरलेला नाही. त्यांनी सकाळी ४:१६ वाजता पोस्ट करून म्हटले की, "जर इस्रायलने ४ वाजेपर्यंत आक्रमण थांबवले तर आम्हालाही हल्ले थांबवण्याची इच्छा आहे. इराणने सोमवारी कतारमधील अमेरिेकेच्या अल-उदईद हवाई तळावर हल्ला केला, पण ट्रम्प यांच्या मते ते "अत्यंत दुर्बळ प्रत्युत्तर" होते. कतारने या हल्ल्याचा तीव्र निषेध करत त्याला आपल्या सार्वभौमत्वावर आघात असे म्हटले आहे.
इराणने सांगितले की, या हल्ल्याद्वारे त्यांनी अमेरिकेच्या अणुकेंद्रांवरील बाँबहल्ल्यांना प्रत्युत्तर दिले. कतारच्या सैनिकी अधिकाऱ्याने सांगितले की इराणकडून १९ क्षेपणास्त्र डागण्यात आले, यापैकी बहुतेक अडवण्यात आले.
हजारो नागरिक मृत व जखमी
इस्रायलमध्ये आतापर्यंत किमान २४ जण मृत झाले असून १ हजाराहून अधिक जखमी आहेत. इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणमध्ये ९७४ लोकांचा मृत्यू झाला असून ३,४५८ जण जखमी झाले आहेत, असे ‘ह्युमन राइट्स एक्टिविस्ट्स’ने सांगितले. अमेरिकेने इस्रायलमधून आपल्या २५० नागरिकांना विमानांद्वारे सुरक्षित बाहेर काढले आहे. इस्रायलमध्ये सुमारे ७ लाख अमेरिकी नागरिक आहेत, त्यात बहुतेकजण दुहेरी नागरिकत्व असलेले आहेत.
युद्धबंदी मोडल्याने ट्रम्प संतप्त
डोनाल्ड ट्रम्प हे मंगळवारी नाटो शिखर परिषदेसाठी व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले तेव्हा त्यांनी इस्रायल आणि इराणवर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इस्रायल आता इराणवर हल्ला करणार नाही आणि सर्व इस्रायली विमाने परत माघारी परततील. तसेच इराण देखील कधीही आपला अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार नाही. असे सांगताना ट्रम्प यांनी दोन्ही देशांवर तीव्र संताप व्यक्त केला.
एअर इंडियाकडून पश्चिम आशियातील उड्डाणे पूर्ववत
नवी दिल्ली : इराण-इस्त्रायल युद्धविरामानंतर हवाई हद्द खुली झाल्यामुळे एअर इंडियाने युरोप, पश्चिम आशियातील आपली उड्डाणे उद्यापासून पूर्ववत सुरू केली आहेत. एअर इंडियाने सांगितले की, यापूर्वी युरोपची विमाने रद्द केली होती. आता ती पुन्हा सुरू केली जातील. अमेरिकेतील पूर्व-पश्चिम भाग व कॅनडात लवकरात लवकर सेवा सुरू केली जाईल. पश्चिम आशियात तणाव वाढल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्या हवाई सीमा बंद केल्या होत्या. त्यामुळे एअर इंडियाने पश्चिम आशियातील वाहतूक बंद केली होती.