तेल अवीव : हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हसन नसरल्लाह याला इस्रायली सैन्याने कंठस्नान घातल्यानंतर आता हिजबुल्लाचा आणखी एक कमांडर नबील कौकचा खात्मा केल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. मात्र अद्याप हिजबुल्लाने कौकच्या मृत्यूला दुजोरा दिलेला नाही. नबील कौक हा हिजबुल्लाच्या केंद्रीय परिषदेचा उपप्रमुख होता. दरम्यान, इस्त्रायली हवाई दलाने येमेनमधील हुथी बंडखोरांवर जोरदार हल्ले सुरू केले असून, येमेनच्या ऊर्जा प्रकल्प व बंदरावर हल्ले केले.
इस्रायली सैन्याने रविवारी सकाळी केलेल्या हल्ल्यात नबील कौकला ठार मारण्यात आले. “हिजबुल्लाच्या प्रतिबंधात्मक सुरक्षा युनिटचा कमांडर आणि केंद्रीय परिषदेचा सदस्य असलेल्या कौकला इस्रायली लढाऊ विमानांनी लष्करी गुप्तचरांच्या अचूक माहितीनुसार लक्ष्य केले आणि त्याचा खात्मा केला, असे इस्रायली लष्कराने जारी केलेल्या ‘पोस्ट’मध्ये म्हटले आहे. प्रत्युत्तरादाखल, हिजबुल्लानेही रविवारी शेकडो रॉकेट आणि क्षेपणास्त्राचा मारा इस्रायलच्या उत्तरेकडे केला, मात्र त्यापैकी बहुतेक क्षेपणास्त्रे चुकीच्या दिशेने गेली, तर काही मोकळ्या जागेत पडली.
इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी या वर्षात हिजबुल्लाच्या नऊ सर्वात वरिष्ठ लष्करी कमांडरपैकी आठ जणांचा खात्मा केला आहे. ज्यात नसरल्लाहचाही समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, यापैकी बहुतेक जण हे गेल्या आठवड्यातच मारले गेले आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या कमांडर्सनी रॉकेट विभागापासून ते एलिट रडवान फोर्सपर्यंतच्या तुकड्यांचे नेतृत्व केले होते.
लेबनॉनने रविवारी पाच दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. यामुळे देशातील सर्व दुकाने, व्यवसाय आणि सरकारी कार्यालये बुधवारपर्यंत बंद राहणार आहेत. आता हाशेम सफीद्दीन हा हिजबुल्लाचा प्रमुख म्हणून हसन नसरल्लाहची जागा घेईल. सफीद्दीन हा नसरल्लाहचा चुलत भाऊ आहे.
नसरल्लाहचा मृतदेह सापडला
इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालेला हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला आहे. वैद्यकीय आणि सुरक्षा पथकांनी हल्ल्याच्या ठिकाणाहून नसरल्लाहचा मृतदेह बाहेर काढला. मात्र, शरीरावर हल्ल्याच्या थेट खुणा नाहीत. त्यामुळे मृत्यू मोठ्या स्फोटाच्या आघाताने झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, इस्रायलने रविवारी लेबनॉनच्या सीमेवर रणगाडे तैनात केले आहेत.