

दुबई/तेहरान : इराणसोबत झालेल्या युद्धविरामानंतरही इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरुतवर भीषण हल्ले चढवल्यामुळे तणाव वाढला आहे. मंगळवारी रात्री जाहीर झालेल्या युद्धविरामावर उभय देशांनी विजयाचा दावा केला असला, तरी शनिवारी होणाऱ्या चर्चेबाबत आता अनिश्चितता निर्माण झाली आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये सुरुंग पेरल्याचे संकेत दिल्याने खनिज तेलाच्या जागतिक वाहतुकीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, कराराचे पालन न झाल्यास यापूर्वीपेक्षाही तीव्र हल्ले करण्यात येतील, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे.
इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील संघर्षाबाबत युद्धविराम करारात स्पष्टता नसल्याने वाद निर्माण झाला आहे. इस्रायलने बुधवारी लेबनॉनमध्ये केलेल्या हल्ल्यात २०३ लोक ठार झाले असून १,००० हून अधिक जण जखमी झाले आहेत. २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धामधील हा लेबनॉनसाठी सर्वात भीषण दिवस ठरला आहे. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने या जीवितहानीची पुष्टी केली असून, लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी इस्रायलच्या हल्ल्यांविरुद्ध संयुक्त राष्ट्रात तक्रार करण्याची घोषणा केली आहे.
इस्रायलने या हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख नईम कासिमचा सहकारी अली युसूफ हर्षी याला ठार केल्याचा दावा केला आहे. दरम्यान, हिजबुल्लावरील हल्ले सुरूच राहतील, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे.
इराणचा इस्रायलला इशारा
शनिवारी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या चर्चेसाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वान्स शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कालीबाफ यांनी इस्रायलचे हल्ले थांबले नाहीत तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. 'द सुफान सेंटर' या संस्थेने हा युद्धविराम कोसळण्याच्या मार्गावर असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.
इराण प्रति पिंप १ डॉलर्स टोल घेणार
इराणच्या आयआरजीसीने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांसाठी नवीन नकाशा तयार केला आहे. समुद्रात पेरलेल्या सुरुंगापासून या जहाजाना वाचवणे हा त्याचा हेतू आहे. या नकाशात धोकादायक भाग दाखवला आहे. त्यात जहाजांना प्रवेश करण्यास मनाई आहे. तसेच या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांना मालाची माहिती द्यावी लागेल. त्यानंतरच त्यांना पुढे जाण्यास परवानगी दिली जाईल. तसेच इराणने प्रत्येक पिंपामागे १ डॉलर टोल घेण्याचे इराणने ठरवले आहे.
होर्मुझमध्ये इराणने समुद्री सुरुंग पेरल्याने खळबळ
होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये इराणच्या 'रिव्होल्युशनरी गार्ड'ने समुद्री सुरुंग पेरल्याचे नकाशे प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली आहे. या सामुद्रधुनीतून जगातील २० टक्के तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक होते. सध्या २३० तेलाची जहाजे या मार्गावर अडकली असून ती तातडीने सोडण्याची मागणी 'युनायटेड अरब अमिराती'च्या तेल कंपनीचे प्रमुख सुलतान अल-जाबेर यांनी केली आहे.
तोवर युद्धनौका इराणजवळ राहणार - ट्रम्प
जोपर्यंत प्रत्यक्ष कराराचे पालन होत नाही, तोपर्यंत अमेरिकन युद्धनौका आणि सैन्य या भागात तैनात राहील, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित आणि मुक्त असेल, असेही ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर नमूद केले.
अणु कार्यक्रमावर इराण ठाम
इराणच्या अणु कार्यक्रमाचा मुद्दाही या युद्धविरामात कळीचा ठरण्याची शक्यता आहे. इराणने युरेनियम संवर्धन सुरूच ठेवण्यावर भर दिला असून अणुऊर्जा संस्थेचे प्रमुख मोहम्मद इस्लामी यांनी हा अधिकार टिकवून ठेवणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने इराणमधील समृद्ध युरेनियम साठा हटवण्याची अट ठेवली आहे.