इस्रायल-इराण संघर्ष शिगेला; इस्रायलचा इराणच्या ‘अराक रिॲक्टर’वर हल्ला

इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाने सातव्या दिवशी अधिक रौद्र रूप धारण केले असून इस्रायलने इराणच्या अणुकार्यक्रमासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘अराक हेवी वॉटर रिॲक्टर’वर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देत इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील मुख्य रुग्णालयावरच क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यामुळे नजीकच्या भविष्यात हा संघर्ष अधिकाधिक चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इस्रायल-इराण संघर्ष शिगेला; इस्रायलचा इराणच्या ‘अराक रिॲक्टर’वर हल्ला
Published on

तेल अवीव/तेहरान : इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाने सातव्या दिवशी अधिक रौद्र रूप धारण केले असून इस्रायलने इराणच्या अणुकार्यक्रमासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘अराक हेवी वॉटर रिॲक्टर’वर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देत इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील मुख्य रुग्णालयावरच क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यामुळे नजीकच्या भविष्यात हा संघर्ष अधिकाधिक चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इस्रायलने इराणच्या अणुकार्यक्रमासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘अराक हेवी वॉटर रिॲक्टर’वर हल्ला केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे किरणोत्सर्गाचा कोणताही धोका नसून या हल्ल्यापूर्वीच हे ठिकाण रिकामे करण्यात आले होते. इस्रायलने गुरुवारी सकाळी या ठिकाणावर हल्ला करणार असल्याचा इशारा देत तेथील लोकांना हे ठिकाण सोडून जाण्याचे आवाहन केले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील एका पोस्टमधून हा इशारा दिला होता. त्यात हल्ल्यापूर्वीची प्लांटची सॅटेलाइट प्रतिमा दाखवण्यात आली होती.

त्यानंतर इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील मुख्य रुग्णालयावर क्षेपणास्त्राने हल्ला केला. यात रुग्णालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ‘सोरोका मेडिकल सेंटर’चे हे रुग्णालय असून ते इस्रायलच्या दक्षिणेकडील मुख्य रुग्णालय आहे. बीर शेबा येथील ‘सोरोका मेडिकल सेंटर’च्या प्रवक्त्याने सांगितले की, रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. तसेच रुग्णालयाकडून लोकांना उपचारांसाठी येऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, हे रुग्णालय सुमारे १००० बेडचे आहे. ते इस्रायलच्या दक्षिणेकडील सुमारे १० लाख लोकांना आरोग्य सेवा पुरवते.

इराणमधील ११० भारतीय भारतात सुखरूप परतले

इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने तेथे राहणाऱ्या हजारो भारतीयांना सुरक्षित परत आणण्‍यासाठी ‘ऑपरेशन सिंधू’ सुरू केले आहे. इराणमधून आणण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिली तुकडी गुरुवारी सकाळी भारतात पोहोचली. पहिल्या तुकडीत ११० हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्‍यान, ४००० हून अधिक भारतीय नागरिक इराणमध्ये राहत आहेत आणि त्यापैकी निम्मे विद्यार्थी आहेत. उत्तर इराणमधून ११० विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे आर्मेनियाला आणण्यात आले. दरम्‍यान, विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सरकारच्या या कारवाईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in