खान युनिस : इस्रायली लढाऊ विमानांनी रविवारी गाझा पट्टीतील एका शरणार्थी शिबिरावर बॉम्ब टाकले. या हल्ल्यात ३३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले, अशी माहिती गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी इस्रायलने काही काळ हल्ले रोखावेत, अशी मागणी अमेरिकेने केली. मात्र, गाझातील हमासच्या दहशतवाद्यांचा बीमोड केल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत, असे इस्रायलने स्पष्ट केले. इस्रायलचे संरक्षण मंत्री याओव गॅलेंट यांनी सांगितले की, गाझा शहरात राहणारी प्रत्येक व्यक्ती आपले जीवन धोक्यात टाकत आहे.
गाझात हमास संचालित आरोग्य खात्याचे प्रवक्ते अशरफ अल किद्रा यांनी सांगितले की, या युद्धात ९४४८ पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, तर इस्रायलचे १४०० जण ठार झाले. रविवारी गाझाच्या मघाजी शरणार्थी शिबिरावर हवाई हल्ले झाले. त्यात ३३ जण ठार, तर ४२ जण जखमी झाले. इस्रायलच्या लष्कराने पॅलेस्टिनी नागरिकांना ज्या भागात शरण घेण्यास सांगितले होते, तेथेच हे शिबीर आहे. हमासचे दहशतवादी व त्यांची संपत्ती नष्ट करण्यासाठी इस्रालयने संपूर्ण गाझात बॉम्बफेक सुरू ठेवली आहे. हमास सामान्य नागरिकांना ढाल बनवत असल्याचा आरोप इस्रायलने केला.
इस्रायलच्या कारवाईचे प्रतिकूल परिणाम -ब्लिंकन
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांनी इशारा दिला की, इस्रायलने साहसवादी आक्रमण सुरूच ठेवल्यास त्याचे परिणाम प्रतिकूल होतील. त्यामुळे दहशतवादाला व हिंसेला वाढावा मिळेल.