तेल अवीव : हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी केलेल्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या आणखी तीन इस्रायली ओलिसांचे मृतदेह गाझामधून एका रात्रीत सापडले, अशी माहिती इस्रायलच्या सैन्याने शुक्रवारी दिली. हनान याब्लोंका, मिशेल निसेनबॉम आणि ओरियन हर्नांडेझ रॅडॉक्स यांचे मृतदेह सापडले आणि त्यांच्या कुटुंबीयांना सूचित केले गेले. हल्ल्याच्या दिवशी ते मेफालसिम चौकात मारले गेले आणि त्यांचे मृतदेह गाझा येथे नेण्यात आले होते.
हमासच्या नेतृत्वाखाली ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यात अतिरेक्यांनी सुमारे १२०० लोक मारले होते आणि सुमारे २५० जणांचे अपहरण केले. नोव्हेंबर महिन्यात एक आठवडाभराच्या युद्धविरामादरम्यान इस्रायलने पकडलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात त्या ओलिसांपैकी सुमारे निम्म्या लोकांना सोडण्यात आले होते. इस्रायलचे म्हणणे आहे की, गाझामध्ये सुमारे १०० ओलिस अजूनही बंदिवान आहेत. तसेच कमीत कमी आणखी ३९ मृतदेह हमासकडे आहेत.
ओलिसांचे संकट सरकारने ज्या प्रकारे हाताळले त्याबद्दल इस्रायलच्या घराघरात संताप वाढत आहे. कतार, अमेरिका आणि इजिप्त यांनी वेळोवेळी केलेल्या मध्यस्थी आणि वाटाघाटींना फारसे यश मिळाले नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला ओलिसांच्या कुटुंबांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका गटाने नवीन व्हिडीओ फुटेज जारी केले. त्यामध्ये हमासने पाच महिला इस्रायली सैनिकांना पकडलेले दिसत आहे. त्यामुळे देशभरात निदर्शने झाली आणि सरकारवरील दबाव वाढला.
ओलिसांच्या सुटकेसाठी सर्व प्रयत्न - नेतन्याहू
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला संपवण्याची आणि सर्व ओलिसांना परत आणण्याची शपथ घेतली आहे. परंतु, त्यात त्यांना अद्याप पूर्ण यश मिळालेले नाही. शुक्रवारी नेतन्याहू म्हणाले की, अपहरण केलेल्या, मारल्या गेलेल्या आणि जे जिवंत आहेत त्यांना परत आणण्यासाठी सर्व काही उपाय करणे हे देशाचे कर्तव्य आहे.