गाझाच्या अल-शिफा रुग्णालयात इस्त्रालयी सैन्य घुसले

अल-शिफा रुग्णालयाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मते, मंगळवारपर्यंत येथे ३६ मुलांची देखभाल केली जात होती.

तेल अवीव : गाझा पट्टीत इस्त्रायल आणि हमासमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. इस्त्रायली लष्कर गाझाच्या अल-शिफा वैद्यकीय संकुलात घुसले आहे. या रुग्णालयात रुग्ण, नवजात शिशू व कर्मचारी, असे एकत्रितपणे २३०० जण अडकले आहेत.

इस्त्रालयाने दावा केला की, अल-शिफा रुग्णालयाच्या खाली हमासचे मुख्यालय आहे. या रुग्णालयाच्या काही ठिकाणी आम्ही हमासविरोधात कारवाई सुरू केली आहे. हमासने शरणागती पत्करावी.

रुग्णालयाच्या आत सुरू असलेल्या लष्करी कारवाया १२ तासांच्या आत बंद व्हायला हव्यात, अशी ताकीद गाझाशी संबंधित अधिकाऱ्यांना इस्त्रालयच्या संरक्षण खात्याने दिली. तसेच हमासच्या दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्यास सांगितले आहे.

प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, इस्त्रायली रणगाडे रुग्णालयाच्या बाहेर आहेत. तर गाझातील रुग्णालयांचे संचालक मोहम्मद जकाऊत यांनी सांगितले की, इस्त्रायली रणगाडे हे अल-शिफा वैद्यकीय संकुलात दाखल झाले आहेत. इस्त्रालयी सैन्याने इमारतीवर हल्ले केले आहेत. मुलांसह रुग्ण घाबरले आहेत. ते रडत आहेत. ही भयानक परिस्थिती असून रुग्णांसाठी प्रार्थना करण्याखेरीज काहीच करू शकत नाही, असे ते म्हणाले.

अल-शिफा रुग्णालयाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मते, मंगळवारपर्यंत येथे ३६ मुलांची देखभाल केली जात होती. ही सर्व मुले मुदतपूर्व जन्मलेली असून त्यांना जगवण्यासाठी ‘इन्क्युबेटर’ची गरज आहे. या रुग्णालयात वीजेचा पुरवठा बंद आहे. तर जनरेटरमधील इंधन संपले आहे. मुदतपूर्व जन्मलेल्या तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. एकमेकांची उब मिळावी म्हणून मुदतपूर्व जन्मलेल्या ३९ बाळांना एकाच बेडवर ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले.

इस्त्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, लष्कराने उत्तर गाझा पट्टीवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. हमासचे दहशतवादी जमिनीखाली बनलेल्या बोगद्यात लपले आहेत. आम्ही या बोगद्यांची माहिती काढली आहे. गाझा सिटी सेंटर व संसदेवर नियंत्रण मिळवले आहे.

गाझात आतापर्यंत १२३०० जणांचा मृत्यू झाला आहे तर इस्त्रालयमध्ये १४०० जणांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रायली वर्तमानपत्राच्या माहितीनुसार, इस्त्रालयी पंतप्रधान युद्धानंतर गाझावर आपले नियंत्रण ठेवू इच्छितात. त्यामुळे अरब देश अमेरिकेपासून दूर होत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in