इस्रायलची गाझात स्थायी संरक्षण जबाबदारी - नेतन्याहू यांच्याकडून गाझा पट्टी ताब्यात घेण्याचे संदेश

अमेरिकेसह अन्य मित्र देशांनी गाझावरील हल्ले थांबवण्यासाठी केलेली विनंती नेतन्याहू यांनी धुडकावून लावली.
इस्रायलची गाझात स्थायी संरक्षण जबाबदारी
- नेतन्याहू यांच्याकडून गाझा पट्टी ताब्यात घेण्याचे संदेश

तेल अवीव : इस्रायल गाझा पट्टीत अनिश्चित काळासाठी संरक्षणाची जबाबदारी पार पाडेल, असे वक्तव्य इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू यांनी एका मुलाखतीत केले आहे. हमासविरोधी लष्करी कारवाई सुरूच राहील. मात्र, अधूनमधून काही वेळासाठी ओलिसांच्या सुटकेसाठी थोडा विराम घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

अमेरिकेसह अन्य मित्र देशांनी गाझावरील हल्ले थांबवण्यासाठी केलेली विनंती नेतन्याहू यांनी धुडकावून लावली. ओलिसांच्या सुटकेसाठी आणि गाझा पट्टीत मानवतावादी मदत पोहोचवण्यासाठी लष्करी कारवाईत अल्प काळ विराम घेतला जाईल, पण एकंदर कारवाई थांबणार नाही. हमासबरोबरील युद्ध संपल्यानंतर इस्रायल गाझा पट्टीत अनिश्चित काळासाठी संरक्षणाची जबाबदारी पार पाडेल, असे नेतन्याहू यांनी सांगितले. मात्र त्याचा नेमका अर्थ काय हे स्पष्ट केले नाही. नेतन्याहू यांनी यावरून अप्रत्यक्षपणे गाझा पट्टीचा ताबा घेण्याचे संकेत दिल्याचेच मानले जात आहे.

हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला ७ नोव्हेंबर रोजी एक महिना पूर्ण झाला. या हल्ल्यात इस्रायलचे साधारण १४०० नागरिक आणि सैनिक मारले गेले होते. या घटनेला एक महिना पूर्ण झाल्याबद्दल मंगळवारी इस्रायलमध्ये सर्वत्र नागरिकांनी १ मिनीट स्तब्धता पाळून मृतांना आदरांजली वाहिली. तेल अवीव आणि जेरूसलेममध्ये मृतांना आदरांजली वाहण्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम आखण्यात आले.

अमेरिकेची आण्विक पाणबुडी आखातात दाखल

इस्रायलने सबुरीचे धोरण स्वीकारण्यास नकार दिल्याने इराण किंवा अन्य देश युद्धात सहभागी होऊन त्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसा परिस्थितीत इराणला प्रतिबंध करण्यासाठी अमेरिकेने यूएसएस फ्लोरिडा नावाची अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी इराणच्या आखाताजवळच्या प्रदेशात तैनात केली आहे. अमेरिकी नौदलाने यापूर्वी यूएसएस जेराल्ड फोर्ड आणि यूएसएस ड्वाइट आयसेनहॉवर या विमानवाहू नौकांचे ताफे भूमध्य समुद्रात तैनात केले होते. त्यासह आखाती प्रदेशात थाड आणि पॅट्रियट ही क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्रेही तैनात केली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in