दहशतवादाचे आकलन नसल्याने द्विपक्षीय संबंधांवर परिणाम; भारत-अमेरिका संबंधांवर जयशंकर यांचे स्पष्ट वक्तव्य

शेजारील देशातून पसरणारा दहशतवाद ही भारताची सर्वात मोठी आणि प्राथमिक चिंता आहे.
दहशतवादाचे आकलन नसल्याने द्विपक्षीय संबंधांवर परिणाम; भारत-अमेरिका संबंधांवर जयशंकर यांचे स्पष्ट वक्तव्य
दहशतवादाचे आकलन नसल्याने द्विपक्षीय संबंधांवर परिणाम; भारत-अमेरिका संबंधांवर जयशंकर यांचे स्पष्ट वक्तव्य(Photo-X)
Published on: 

न्यू यॉर्क : शेजारील देशातून पसरणारा दहशतवाद ही भारताची सर्वात मोठी आणि प्राथमिक चिंता आहे. भारताच्या या समस्येचे आणि संवेदनशीलतेचे जागतिक भागीदारांनी योग्य प्रकारे आकलन केलेले नाही, तर त्याचा थेट परिणाम द्विपक्षीय संबंधांवर होतो, अशा स्पष्ट शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिका आणि पाकिस्तानच्या वाढत्या जवळीकीच्या पार्श्वभूमीवर भारत-अमेरिका संबंधांवर भाष्य केले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ८१ व्या सत्राचा उच्चस्तरीय आठवडा पार पडल्यानंतर, 'आशिया सोसायटी'तर्फे आयोजित एका विशेष कार्यक्रमात जयशंकर यांनी भारतीय-अमेरिकन समुदाय आणि धोरण तज्ज्ञांशी संवाद साधला. अमेरिकेचे माजी मुत्सद्दी डॅनियल रसेल यांनी जयशंकर यांना व्यापार, शुल्क (टॅरिफ) आणि गेल्या वर्षभरातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत-अमेरिका संबंध पुन्हा सकारात्मक मार्गावर आणण्यासाठी काय आवश्यक आहे, असा प्रश्न विचारला होता.

जयशंकर म्हणाले, मी या संबंधांकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहतो. जगातील अनेक देशांचे अमेरिकेसोबतचे संबंध आव्हानात्मक राहिले आहेत. ही समाधानाची गोष्ट नसली तरी ते एक वास्तव आहे. यानंतर त्यांनी पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या जवळीकीचा अप्रत्यक्ष संदर्भ देत सांगितले की, कोणत्याही दोन देशांमधील संबंध हे एकमेकांच्या संवेदनशीलतेचा आदर करण्यावर अवलंबून असतात.पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता जयशंकर म्हणाले, भारतासाठी दहशतवाद हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. गेल्या अनेक दशकांपासून शेजारील देशाकडून एका विशिष्ट धोरणाचा भाग म्हणून ज्या प्रकारच्या दहशतवादाचा सामना भारताने केला आहे, तितका त्रास जगातील फार कमी देशांनी सहन केला असेल.

आमच्यासाठी इतक्या महत्त्वाच्या असलेल्या विषयाबद्दल जेव्हा आमच्या भागीदार देशाकडून पुरेशी समज, सहानुभूती किंवा गांभीर्य दाखवले जात नाही, तेव्हा नक्कीच अडचण निर्माण होते. माझ्या मुख्य चिंतेची कदर जर माझ्या भागीदाराने केली नाही, तर त्याचा संबंधांवर विपरीत परिणाम होतो.गेल्या काही महिन्यांत भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये व्यापार, आयात शुल्क, रशियाकडून भारताची इंधन खरेदी आणि वॉशिंग्टनची पाकिस्तानसोबतची नव्याने सुरू झालेली मुत्सद्दी जवळीक यांमुळे काही प्रमाणात तणाव दिसून आला आहे. भाषणाचा शेवट करताना जयशंकर यांनी आशा व्यक्त केली की, भारत आणि अमेरिकेतील संबंध पुन्हा एकदा सकारात्मक दिशेने पुढे जातील. मात्र, दोन्ही देशांसमोरील आव्हानांचे वास्तव स्वीकारून त्यावर मार्ग काढल्यासच संबंध अधिक मजबूत होऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in